Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेख...सबको सन्मती दे भगवान!

…सबको सन्मती दे भगवान!

देशातील राष्ट्रपुरुषांवर, संतांवर आणि ज्यांनी समाज घडवण्यासाठी हयात वेचली अशा महनीय व्यक्तिमत्वांवर जातीची लेबले चिटकवण्याची चढाओढ सध्या लागली आहे. समाजातून जात हद्दपार करण्यासाठी सर्वच महनीय व्यकिमत्वांनी प्रचंड कष्ट उपसले. समाजाकडून अवहेलना, प्रसंगी चिखल आणि शेणफेकही सहन केली. पण जातमुक्त समाजाचा घेतला वसा कधीही टाकला नाही. पण आज मात्र त्यांच्या प्रतिमांना जातीपातीचा टिळा लावण्याचे ‘महत्कार्य’ पार पाडून त्यांना लघुत्तम ठरवण्याच्या प्रयत्नांना सर्वत्र उधाण आल्यासारखे आढळते. याला कोणताही राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते अपवाद नाहीत. अलीकडच्या काळात संत आणि राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी ही तर अशा संधीसाधुंसाठी पर्वणीच ठरत आहे. मंचावरुन, व्यासपीठावरुन समाजाला जातीत विभागू नका असा शहाजोग सल्ला देणारे, निवडणुकांचा हंमाम सुरु झाला की मतांचा गल्ला गोळा करण्यासाठी जातीपातीच्या राजकारणात सुखनैव डुंबत असतात. शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकमान्य टिळक व असे असंख्य महनीय आणि सगळे संत हे कोणत्या जातीचे याची उठाठेव करण्यात सगळेच धन्यता मानतात. ‘सगळे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत’ या शिकवणीचा सोयीस्कर विसर सर्वांनाच का पडतो? दुदैर्वाने याला सध्या तरी कोणीही अपवाद आढळत नाही. अगदी सामान्य माणसेही नाहीत. घरातील विवाह जमवताना हमखात जातीचा आधार घेण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. आंतरजातीय विवाह अजुनही स्वीकारार्ह नाहीत. तो विरोध मोडून काढून विवाह करणारांना त्याची किंमत मोजावी लागते. प्रसंगी जीवाची सुद्धा. अर्थात, त्यात फक्त सामान्य माणसांची चूक आहे असे म्हणता येईल का? जे वरती घडते तेच खाली पाझरते असे म्हणतात. त्यामुळे जातीमुक्त समाज घडवण्याची सुरुवात करायची झाली तर ती केंद्रापासून करावी लागेल. नेते त्यांच्या प्रदेशाचे, जातीचे भांडवल करणे बंद करु शकतील का? नेता, सर्वांचा नेता असतो. तो कोणत्या समाजाचा, प्रदेशाचा याने फरक का पडावा? जसे महाराष्ट्रात अनेक संत घडले. तीच परंपरा देशाच्या प्रत्येक राज्यात आहे. त्यांनीही समाज जातीमुक्त करण्याचेच स्वप्न पाहिले होते. जसे की, तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूवर हे महान संत होऊन गेले. त्यांनी रचलेला ‘तिरुक्कुरल’ हा काव्यग्रंथ प्राचीन मानला जातो. त्याची रचना ख्रिस्त पूर्व दुसरी ते सहावी शताब्दी या काळात झाली असेही मानले जाते. स्वातंत्र्यपूर्वकाळात नेते ही उपाधी अस्तित्वातच नव्हती. तेव्हा महात्मा होते, लोकमान्य होते, संत होते पण देशाच्या सुदैवाने यातील कोणीही नेते किंवा पुढारी म्हणवले गेले नाहीत. त्यांच्या नावामागे कधीच जात चिकटलेली नव्हती. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ जनतेनेच त्यांना महात्मा आणि लोकमान्य ठरवले होते. निदान, संधीसाधूपणासाठी त्यांचे तरी वाटप करु नये. त्यांना संत आणि राष्टपुरुषच राहू द्यावे हे राजकारण्यांना कोण समजावून सांगू शकेल? थोरामोठ्यांची जात शोधण्याचा प्रकार देशाच्या एकामत्मेला घातक आहे याची जाणीव संबंधितांना कधी होणार? एका बाजूला देश एक करायचे स्वप्न पाहायचे. आणि दुसर्‍या बाजूला जो तो आपल्या हक्काचा तुकडा काढून मागतो. तो मागण्यासाठी संत आणि राष्टपुरुषांच्या नावाचा गैरवापर बिनदिक्कतपणे केला जातो. त्यांच्या नावावर, त्यांच्या कार्यावर जातीचा ठप्पा मारणे हा गैरवापरच आहे. त्याचे सोयरसुतक कोणालाही वाटत नाही हे समाजाचे खरे दुर्दैव! राजकारण करण्यासारखे अनेक विषय आहेत. त्यासाठी देशाच्या आदर्शांना वेठीला धरण्याची गरज नाही याची जाणीव जातनिष्ठ तुंबडीभरुंना कोण करुन देणार? ती करुन देण्याची जबाबदारी जागरुक नागरिकच पार पाडू शकतील, मात्र मनावर घेतले तर!

- Advertisment -

ताज्या बातम्या