राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काल दिवसभरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत होते. त्यामुळे धरणांचे विसर्ग काहीसे घटविण्यात आले आहेत. नांदुरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग घटविण्यात आला. या बंधार्यातून 94497 क्यूसेक ने सुरू असलेला विसर्ग कमी करून तो 64726 क्यूसेकवर आणण्यात आला आहे. खाली जायकवाडीत काल सायंकाळी 85727 क्यूसेक ने पाण्याची आवक होत होती.
काल दिवसभरात दारणा च्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाचे अधून-मधून आगमन होत होते. दारणा च्या भिंतीजवळ 12 मिमी पावसाची नोंद झाली. भाम ला 22 मिमी तर भावलीला 31 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाचा विसर्ग 16958 वरून पाण्याची आवक पाहता 19312 क्यूसेक वर नेण्यात आला. पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तो 13100 क्यूसेक वर आणण्यात आला. दारणा धरणात पाणलोटासह भावलीतून 1361 क्यूसेक, भाम मधून 3252 क्यूसेक ने आवक होत आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावरील पाणी वाहून येत आहे. दारणा धरणातून काल सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 3 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला. 15394 क्यूसेक वरून तो काल 6 वाजता 8370 क्यूसेक वर आणण्यात आला. गंगापूर मध्ये गौतमी गोदावरी धरणातून 1500 क्यूसेक व कश्यपी धरणातून 500 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळ पर्यंत गंगापूर मधून 2.1 टीएमसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आला. काल दिवसभरात गंगापूरच्या भिंतीजवळ 12 मिमी, त्र्यंबक ला 10 मिमी, आंबोलीला 44 मिमी, कश्यपिला 28 मिमी, गौतमीला 24 मिमी पावसाची नोंद झाली.
दारणा व गंगापूर धरणांच्याच्या व्यतिरिक्त कडवातून 8370 क्यूसेक, पालखेड मधून 3540 क्यूसेक, पुणेगाव मधून 1568 क्यूसेक, ओझरखेड मधून 1750 क्यूसेक, वालदेवी 2175 क्यूसेक, भोजापूर मधून 2800 क्यूसेक, आळंदी 37 क्यूसेक असे विसर्ग सुरू आहेत. खाली नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सायंकाळी 6 वाजता 64726 क्यूसेक ने विसर्ग सुरू होता. वरील धरणातील विसर्ग कमी झाल्याने या बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग 94497 क्यूसेक वरून 24 तासात कमी कमी करत तो 64726 क्यूसेकवर आणण्यात आला.
काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने 7.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 1 जूनपासून जायकवाडीत 16.3 टीएमसी पाणी वाहून गेले आहे.
जायकवाडी 44 टक्के
जायकवाडी जलाशयात गोदावरीतून काल सायंकाळी 6 वाजता 85 हजार 722 क्यूसेक ने पाण्याची आवक होत होती. मोठी आवक झाल्याने 24 तासात 7 टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. 24 तासात 27.2 टीएमसी वरून 34 टीएमसी वर उपयुक्त साठा झाला आहे. तर मृतसह एकूण साठा 59.74 टक्के इतका झाला आहे. धरणात उपयुक्त साठा 43.91 टक्के झाला आहे.




