Monday, September 16, 2024
Homeनगरगोदावरीचा विसर्ग 47923 क्युसेकवर तर प्रवरा, मुळाचा पूर ओसरला

गोदावरीचा विसर्ग 47923 क्युसेकवर तर प्रवरा, मुळाचा पूर ओसरला

जायकवाडीत 66 हजार 367 क्युसेकने आवक || निळवंडेत पाण्याची आवक || भोजापूरही ओव्हरफ्लो || भीमा नदीचा पूर वाढला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

पावसाचा जोर मंदावल्याने धरणांमधील विसर्ग काल काही अंशी घटविण्यात आले आहेत. त्यामुळे 54233 क्युसेकवर गेलेल्या गोदावरीतील विसर्ग काल सायंकाळी घटवून 47923 क्युसेकवर आणण्यात आला होता. रात्री 8 वाजता हा विसर्ग 38458 क्युसेक करण्यात आला होता. दरम्यान, काल सायंकाळी 6 वाजता गोदावरी, प्रवरा नदीतील विसर्गामुळे जायकवाडीत 66 हजार 367 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. काल सायंकाळी जायकवाडीत उपयुक्तसाठा 15.94 टक्के इतका झाला होता. काल गंगापूर धरणाच्या पाणलोटात दिवसभर ऊन पडले होते. तर दारणाच्या पाणलोटात हलक्या सरींचे आगमन होत होते. गंगापूर मधील आवक मंदावल्याने या धरणातून 8 हजार क्युसेकने सोडण्यात येणारा विसर्ग कमी करत तो काल सायंकाळी 6 वाजता 470 क्युसेकवर आणण्यात आला. 22 हजारावर गेलेल्या दारणाचा विसर्ग 5356 क्युसेक इतका कमी करण्यात आला. भावली 588 क्युसेक, कडवा 367 क्युसेक, भाम 2570 क्युसेक, वालदेवी 183 क्युसेक, पालखेड 1502 क्युसेक यावर स्थिर करण्यात आले आहेत.

वरील धरणांमधील विसर्ग घटल्याने काल सकाळी 6 वाजता 54233 क्युसेकने सुरु असलेला नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणारा गोदावरीतील विसर्ग काल सायंकाळी 5 वाजता 6310 क्युसेकने कमी करुन तो 47923 क्युसेकवर आणण्यात आला. हा विसर्ग उशीरा पर्यंत टिकून होता. हा विसर्गही वरील पाण्याची आवक पाहता आणखी त्यात घट होवु शकते. काल सकाळी 6 पर्यंत एक जुन पासुन या बंधार्‍यात जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 10.4 टिएमसी इतका विसर्ग करण्यात आला आहे. अजुनही विसर्ग सुरु आहे. दरम्यान गोदावरी चे उजवा तसेच डावा कालवा जास्तीच्या नदी विसर्गामुळे दोन दिवसांपासुन त्यांचे गेट टांगल्याने विसर्ग बंद झाला. आता आज मंगळवारी गोदावरीतील विसर्ग कमी करण्यात येणार असल्याने हा विसर्ग पुन्हा सुरु होईल.

दरम्यान, जायकवाडीत काल गोदावरी तसेच प्रवरा नदीतुन विसर्ग दाखल होत आहे. काल सायंकाळी 66 हजार 367 क्युसेकने विसर्ग जायकवाडी जलाशयात सामावत होता. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीत 15.94 टक्के उपयुक्तसाठा झाला होता. म्हणजेच उपयुक्तसाठा 12.2 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 38.29 टीएमसी इतका झाला होता. एक दोन दिवसात या जलाशयात उपयुक्तसाठ्यात वाढ होणार आहे.

प्रवरा, मुळाचा पूर ओसरला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात गत दोन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर आला होता. पण रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही घटला आहे. परिणामी नदीतील पूरही ओसरला आहे.
शनिवारी रात्री पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघरमध्ये तब्बल 19 तर रतनवाडी आणि पांजरेत 18 इंच पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याचे लोंढेच्या लोढे येत होते. प्रचंड पाण्याची आवक झाल्याने भंडारदरा आणि निळवंडेतून पाणी सोडण्यात आले. काल सायंकाळी निळवंडेतून30775 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला होता. गत दोन दिवसांपासून पाणलोटात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. पण आता सर्वकाही शांत शांत झाले आहे.

काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 10274 दलघफू होता.तर विसर्ग केवळ 5176 क्युसेक होता. तर निळवंडेत 7341 दलघफू (88.15टक्के) साठा होता. या धरणातून प्रवरा नदीत 8122 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

निळवंडेत 24 तासांत 2250 दलघफू पाण्याची आवक
पाणलोटातील घाटघर, पांजरे, रतनवाडी आणि भंडारदरात धो-धो पाऊस कोसळल्याने काल सोमवारी सकाळी
संपलेल्या 24 तासांत निळवंडे धरणात तब्बल 2250 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. परिणामी प्रवरा नदीला
पूर आला.

भोजापूरही ओव्हरफ्लो

म्हाळुंगी नदी प्रवाही; धरणातून विसर्ग सुरू

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण निमोण भागाला वरदान ठरलेले म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून म्हाळुंगी नदी प्रवाही झाली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर पट्ट्यातील म्हाळुंगी नदीवर असलेल्या भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफूट इतका असतो. पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भोजापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच सिन्नर व संगमनेर भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भोजापूर धरण भरण्याची सर्वांना अपेक्षा होती. पश्चिम पट्ट्यात विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे.

शुक्रवार पासून उगमस्थानात जोरदार पाऊस सुरु झाल्याने नदीला पहिल्यांदा पूर आला होता. त्यामुळे भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात झाली होती. रविवारी सायंकाळी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला होता. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 483 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. धरणातील पाणीसाठा तसेच सांडव्याद्वारे वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची दिवसभर गर्दी सुरु होती. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले असले तरी परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने पूर्व भागातील लाभक्षेत्रात चारीद्वारे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

भीमा नदीचा पूर वाढला

दौंड पुलाजवळील विसर्ग तब्बल 2 लाख 6 हजार क्युसेक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीचा पूर तासागणिक वाढत आहे. काल सायंकाळी पाच वाजता दौंड पुलाजवळील विसर्ग तब्बल 2 लाख 6 हजार क्युसेकने सुरू होता. खडकवासला साखळीतील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने या धरणांमधून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आल्याने ही पाण्याची पातळी वाढत आहे. या पुरामुळे काष्टीतील नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या