Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : पापाचा घडा अखेर भरलाच

राज-का-रण : पापाचा घडा अखेर भरलाच

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचा संपूर्ण ताबा घेऊन नामकर्ण आवारे सर्वेसर्वा बनत होते तेव्हाच अशोक खरात यांचेही पीक जोमात होते. समानशीले व्यसनेषू सख्यम या न्यायाने खरात व आवारे जोडी जमली. खरातांनी त्यांना शिवनिका संस्थानमध्ये घेतले तर आवारेंनी खरातला जगदंबा पतसंस्थेत. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हा सहकाराचा मूलमंत्र दोघांनी किती रसरशीतपणे अंगी बाणला हे यातून दिसते.

बाहेर साचें, आत कुटील|
तया लावी, यमराज गाळ॥

कपटी माणसाचे लक्षण सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, जे वरून खरे बोलतात पण आतून कपटी असतात, त्यांना यमराज शिक्षा करतो. किती सार्थ अन् आशावादी विचार. कपट करतो त्याला शिक्षा होणारच, असा आशावाद त्यांनी केवळ जोपासला नाही तर लोकांनाही त्यावर विश्वास ठेवायला लावला. आपले सारे संत हे त्रिकालदर्शी होते. भविष्यातील असंख्य घडामोडींवरही त्यांनी सार्थ टिपण केलेले आढळते. याचा आठव व्हायचे कारण म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱे भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण.

या बाबाच्या दररोज अशा काही हकिगती बाहेर येत आहेत की त्यापुढे वेबसीरिजही फिया पडाव्यात. बाहेर पडणार्‍या प्रत्येक घटनेवर वेबसीरिज तयार होऊन ती खोर्‍याने पैसे ओढू शकेल, एवढा मसाला त्यात भरलेला आढळतो. या फाईल्समध्ये भरती झालेले एक ताजे प्रकरण म्हणजे नामकर्ण आवारेंची अटक. हे महाशय, सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे विद्यमान चेअरमन आहेत. स्वत:ला सहकार क्षेत्रातील बापमाणूस समजणारे हे महाशय सगळ्या जगालाच कस्पटासमान लेखता लेखता अतिशहाणपणामुळे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडून सध्या जेलबंद झाले आहेत.

खरात फाईल्स अधिक समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलणारे नामकर्ण आवारे यांना अटक होताच, सामान्यजनांकडून व त्यांना ओळखणार्‍यांकडून पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली ती म्हणजे पापाचा घडा भरला, ही. या तीन शब्दांच्या प्रतिक्रियेत किती अव्यक्त भावना व्यक्त झाल्या हे कळावे. खरात यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या शिवनिका संस्थानमध्ये खजिनदार, सचिव असलेले आवारे यांनी सुरुवातीला मी नाही त्यातली, ही भूमिका घेतली. त्यांच्या जगदंबा पतसंस्थेचे नाव खरात फाईल्समध्ये असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या महाशयांनी आकांडतांडव केले.

माध्यमांना खुलासे प्रसिद्ध करायला भाग पाडले. परंतु काही दिवसांतच त्याच पतसंस्थेत बनावट खाती उघडायला परवानगी देत कोट्यवधीचे बेनामी व्यवहार करून खरातच्या कूकर्माला साथ दिल्यामुळे त्यांना अटकेत जावे लागले. मांजर चोरून; पण डोळे मिटून जेव्हा दूध पित असते तेव्हा आपल्याला कोणीच पाहत नाही, असे तिला वाटत असते. आवारेंच्या भानगडी याच थाटाच्या होत्या. प्रश्न फक्त एवढाच होता की, गेल्या तीस-पस्तीस वर्षांत हे गृहस्थ एवढे मोठे झाले होते की, त्यांनी पितृसमान सूर्यभान गडाखांसह माणिकराव कोकाटे व राजाभाऊ वाजे आदी लोकप्रिय लोकप्रतिनिधींनाही प्रसंगोपात थप्पीला लावले व त्यांच्याशी कपट केले तरी त्यांच्या वाट्याला जाण्याची कोणी कधी हिंमत केली नव्हती. त्यामुळेच त्यांना अटक होताच, त्यांच्या औद्योगिक वसाहतीतील संचालक, उद्योजक व कर्मचार्‍यांसह त्यांच्या वर्तणुकीचा फटका बसलेल्या असंख्य लोकांची पाप्याचा घडा भरला ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली ती किती सार्थ होती हे पटावे.

संत तुकारामांनी अशा कपटींबद्दल पुढे असेही लिहून ठेवले आहे,
काय तो कपटी, काय तो काळा|
यासी टाळी, जो तो डोळा॥

जो कपटी आणि स्वार्थी आहे, त्याला डोळ्यांदेखत सोडून द्यावे, म्हणजे त्याच्यापासून दूर राहावे, असे संत म्हणत. त्याचाच आधार घेत आजपर्यंत आवारेंनी ज्या मंडळींना त्रास दिला त्यांनी वर्तन केले. आवारे हे अलीकडच्या काळात एवढे मोठे झाले होते की जवळच्या सहकार्‍यांनाही ते जुमानेनासे झाले होते. त्यातून औद्योगिक वसाहतीतील संचालकांमध्येही धुसफूस होती. पण केवळ त्यांच्या दबदब्यामुळे सुनील कुंदे, कमलाकर पोटे आदींनी त्यांच्या नादी न लागता आपली वाट बदलून घेतली. वसाहत मोठी करण्यात आवारेंचे मोठे योगदान होते, बंद कारखाने पुन्हा सुरू व्हावेत यातही त्यांनी जिद्द दाखविली, हे खरेच. त्याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

परंतु अशी कामे करताना ती सांघिक असतानाही त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे माणसं दुखावली गेली. ‘असा मी नामकर्ण’, हे आत्मचरित्र प्रसिद्ध करून आवारेंनी सगळ्यावरच कडी केलेली असली तरी सिन्नरच्या बव्हंशी लोकांना त्यांची पूर्वपीठिका माहीत होती. सूर्यभान गडाख आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात शिपाई म्हणून आयुष्याची सुरुवात करणारा कुंदेवाडीचा एक साधा पोरगा नंतर त्याच सूर्यभान नानांचे, त्यांच्या चिरंजीवांचे, त्यांना साथ देणार्‍या दिलीप शिंदे अशा अनेकांचे बारा वाजविणारा महाबिलंदर निघाला हे तसे आक्रितच. पण त्यांच्या दृष्टीने ही त्यांच्या कष्ट, कौशल्य आणि हिमतीची प्रगती होती. सूर्यभान गडाख यांनी या बारावी झालेल्या मुलाला शिपायापासून कारकून नंतर पीए, औद्योगिक वसाहतीचा व्यवस्थापक, महाव्यवस्थापकपद अशा शिखरावर नेताना पुत्रवत प्रेम केले.

सहकार कायद्याच्या नियमांमुळे नानांना वसाहतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे चिरंजीव अण्णा गडाख यांच्याकडे ओघानेच सूत्रे आली खरी; परंतु आपल्या अंगभूत पाताळयंत्री गुणांमुळे आवारे अण्णांना नामधारी बनवून स्वत: सर्वेसर्वा बनले. अर्थात, अण्णांनीही कधी सावध शहाणपणा दाखविला नाही. आवारेंनी त्या काळात दिलीप शिंदेंना हाताशी धरून कामगारांची संघटना स्थापन केली. उद्योजकांना इतर त्रास देतात म्हणून ही संघटना स्थापन केल्याचे दाखविले गेले खरे; पण पुढे त्यांचे खरे दात दिसले. याच काळात तुकाराम दिघोळे, प्रकाशशेठ शहा व सूर्यभान गडाख यांच्यातील राजकीय संघर्षात शिंदेंसह आवारेंनी दिघोळेंना मदत करून गडाख पर्वाचा अस्त करण्यास सुरुवात केली होती. अण्णा गडाखांशीही मतभेद झाल्यानंतर आवारेंनी त्यांनाही पद्धतशीर बाजूला करून दिलीप शिंदेंना चेअरमन केले. या सर्व काळात आवारे वसाहतीचे व्यवस्थापक होते हे महत्त्वाचे.

पण सारा कारभार तेच चालवित असत. गडाख कुटुंबीयांना बाजूला केल्यानंतर त्यांनी शिंदेंना लक्ष्य केले. ते टारगेटदेखील त्यांनी यथास्थित पार पाडले. शिंदेंना बाजूला केल्यानंतर आवारे वसाहतीत खर्‍या अर्थाने सर्वेसर्वा बनले. या स्थित्यंतराच्या काळात ते अधूनमधून राजाभाऊ वाजे, माणिकराव कोकाटे आदींचाही खुबीने वापर करीत राहिले. उद्योजकांच्या वर्तुळात त्यांनी आपली प्रतिमा अत्यंत हुशार, धाडसी अशी केलेली होतीच. परिस्थितीनुरूप ते राजकीय पक्षांचाही वापर करीत राहिले. वसाहतीवर संपूर्ण कब्जा असल्यामुळे शयतो सगळे पुढारीही त्यांच्याशी जुळवून घेत गेल्याने त्यांचा अहंकार दिवसागणिक गगनाला भिडत गेला. त्यातूनच त्यांना सदैव साथ देणार्‍या कमलाकर पोटेंसारख्या व्यवस्थापकाला निवृत्तीचे कारण दाखवून दूर केले. त्यांच्या मदतीने निवडणूक जिंकली आणि सत्ता येताच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला, हा इतिहास तर अगदीच ताजा आहे. सूर्यभान गडाखांनी आवारेंच्या आयुष्याची सुरुवात करून देताना नंतरही त्यांच्यावर पित्यासमान माया केली; पण याच आवारेंनी नंतर वसाहतीच्या मुख्यालयातील त्यांची तसबीरदेखील फेकायला मागेपुढे पाहिले नाही. संस्थापक म्हणून होत असलेले त्यांचे स्मरणही बंद करायला लावले. माणूस किती कृतघ्न होऊ शकतो, याचे हे दु:खद उदाहरण. त्यांच्या या कृतघ्नपणाचेच फळ त्यांना आता मिळतेय, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आवारे यांचे कॅप्टन खरात यांच्याशी सख्य होते, ही बाब सगळ्या दुनियेला माहिती होतीच; परंतु त्यांच्या संबंधातील आतल्या भानगडी नव्याने लोकांना कळायला लागल्यानंतर हे तर ‘मिनी खरात’ अशाही प्रतिक्रिया उमटल्या. औद्योगिक वसाहतीत बस्तान बसविल्यानंतर त्यांनी जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेची स्थापना केली. अंगभूत गुणांमुळे त्यांनी संस्थेचीही भरभराट केली. याच काळात अशोक खरात यांचेही पीक जोमात होते. समानशीले व्यसनेषू सख्यम या न्यायाने खरात व आवारे जोडी जमली. खरातांनी त्यांना शिवनिका संस्थानमध्ये घेतले तर आवारेंनी खरातला जगदंबा पतसंस्थेत. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हा सहकाराचा मूलमंत्र दोघांनी किती रसरशीतपणे अंगी बाणला हे यातून दिसते. पुढे ईशान्येश्वर मंदिर बांधकामही आवारेंच्याच मार्गदर्शनाखाली झाले. त्याचे मार्केटिंगही त्यांनीच केले. या नात्याने ते तेथे येणार्‍या प्रत्येक बड्या माणसाची खुशामत करायला पुढे येत राहिले.

येणारा प्रत्येक सेलेब्रिटी मंदिराला भेट दिल्यानंतर किंवा आधी सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात येत राहिला. त्यांचे तेथे आवभगत करून आवारेंनी आपलेही स्थान बळकट केले. खरात व आवारे असे परस्परांच्या तुंबड्या भरीत राहिल्यानेच पुढील सगळे महाभारत घडले. जगदंबा पतसंस्थेत खरातला त्यांनी चेअरमनही केले. याच काळात ३२ बेनामी खाती उघडली गेली. त्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार केले गेले. या बदमाशगिरीपोटी आवारेंना दोन टक्के कमिशन देत होतो, असे साक्षात खरातनेच जबाबात सांगितले असल्याने आवारेंची आता त्यातून सुटका नाही. पृथ्वीतलावर आम्ही काहीही करू शकतो, अशा अहंकारात हे दोघेही नंतर वावरू लागले. राज्याचे प्रमुख, देशातील बडे नेते, प्रशासनातील बड्या हस्ती अशी सारीच आयुधे खरातांच्या दरबारात लीन होत असताना आवारेही त्याचा प्रसादाचा लाभ पुरेपूर उपभोगत होते.

भाजपची चलती सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांचेच बोट धरून फिरणार्‍या विठ्ठल जपे यांना त्यांनी भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष केले व आपल्याला हवे ते करून घेतले. आवारेदेखील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या भाजप आघाडीच्या प्रदेश समितीत जाऊन बसले. गडाखांपासून वाजे व कोकाटे यांच्यासारख्यांचाही सोयीने वापर करून नंतर गरज संपल्यानंतर त्यांच्यापासून दूर होण्यात त्यांना कधीही साधं कसनुसंही झाले नाही, एवढा निगरगट्टपणा त्यांच्यात भिनला होता. मध्यंतरी त्यांचे खरातांवरील प्रेम कमी झाले, असे म्हणतात. ते दूर झाले. शिवनिका संस्थानचा त्यांनी राजीनामा दिला. पण भूतकाळ माणसाची सावलीसारखी साथ देतो, असे म्हणतात. तसेच काहीसे आवारेंचेही झाले. आपण फार पूर्वीच खरातांची साथ सोडली असे खासगीत सांगून हात झटकू पाहणार्‍या आवारेंना त्यांच्या भूतकाळाने मात्र नेमकेपणाने पुढे आणले. शेवटी याच जन्मात सगळं भोगावे लागते, असे म्हणतात ते किती यथार्थ आहे, याची प्रचिती अशा घटनांमुळे येते.

भोगें कळों येती मागिल ते जन्म | उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे | भोग देते वेळे येईल कळों ॥

या अभंगाप्रमाणे आता आवारेंना आपण पूर्वी केलेल्या चुका आठवून पश्चातापाची भावना झाली तरी पुष्कळ.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील...

0
नाशिक | Nashik नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या सततच्या सरींमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड...