Monday, August 17, 2026
HomeनगरShani Shingnapur : शनि जयंती व शनिअमावस्येनिमित्त शिंगणापुरात 6 लाख भाविकांची गर्दी

Shani Shingnapur : शनि जयंती व शनिअमावस्येनिमित्त शिंगणापुरात 6 लाख भाविकांची गर्दी

200 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर || 300 सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त

शनिशिंगणापूर |वार्ताहर|Shani Shingnapur

तब्बल 13 वर्षांनंतर शनी जयंती व शनि अमावस्या हा दुर्मिळ महायोग जुळून आल्याने शनिशिंगणापुरात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून तब्बल सहा लाखाहून अधिक शनी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनी अमवास्येचा पर्वकाळ हा 20 तास 20 मिनिटाचा असल्याने भाविकांचा तीव्र उन्हामध्ये ओघ टिकून होता. याआधी 23 ऑगस्ट 2025 व 20 डिसेंबर 2025 ला शनीअमावास्या होती. त्यावेळच्या तुलनेत यावेळी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने गर्दीचा विक्रम झाला. दरम्यान या काळासाठी मंदिर 24 तास खुले राहणार असल्याने चौथर्‍यावरचे दर्शन बंद करण्यात आले होते.

- Advertisement -

यात्रेदरम्यान छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रोडवरील कांगोणी फाटा, मुळा कारखाना परिसर, शनेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसर आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी देवस्थान प्रशासन व अ‍ॅड. सयाराम बानकर, आर. एन. रेपाळे, मुळा कारखाना यांनी 6 एकरहून अधिक जागा उपलब्ध करून मोफत वाहन तळाची प्रथमच सोय उपलब्ध करून दिली होती. चारी बाजूने रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. या यात्रेदरम्यान दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, 300 हून अधिक सुरक्षारक्षक तैनात केले होते.

स्वतः पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर
भाविकाचे दर्शन सुलभ व समाधानाने व्हावे यासाठी चक्क पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः सूचना देत शनिचरणी सेवा अर्पण केली.अ‍ॅड.सयाराम बानकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वाहतुकीची कोंडी न होण्यासाठी देवस्थान व पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक घेऊन उपाययोजना आखून गुन्हेगारी रोखण्यासाठी व सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे सर्वांनी कार्यान्वित करण्याची सूचना केली. ग्रुप करून भाविक सोडण्यात येत होते.
पहाटे माजी खा. चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भीमाले, पंकज पटेल यांच्या हस्ते आरती झाली. दुपारीची आरती राकेश कुमार व सौरभ बोरा तर सायंकाळची आरती हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार व उद्योगपती जयेश शहा यांच्या हस्ते करण्यात आली.आमदार विठ्ठलराव लंघे, आ. सुनील शिंदे, खेडमंचरचे आ. बाबाजी काळे व आ. अमोल खताळ यांनीही हजेरी लावली. शिंगणापूर ग्रामपंचायतने तिन्ही नाक्यांवर स्वच्छ गार पाण्याचे जार, पाणी योजनेतून पिण्याचे पाणी तसेच परिसरात अन्नदान भंडारासाठी व देवस्थानने आणलेल्या पाण्याच्या टँकरमध्ये या पाणी योजनेतून मोफत पाणीपुरवठा करून दिले होते.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...