पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)
पाथर्डी शहरातील जुन्या एसटी स्थानक परिसरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला असून, गर्दीचा फायदा घेत अज्ञात युवकाने प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांची सोन्याची साखळी लंपास केली. या प्रकारामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात काजीम इब्राहीम सय्यद (वय ५६, रा. संभाजीनगर गल्ली, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ते बीड येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते पाथर्डी बस स्थानकात पोहोचले. तेथे बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत बसले असताना, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बीडकडे जाणारी बस आल्यावर ते बसमध्ये चढण्यासाठी पुढे गेले.
या वेळी झालेल्या गर्दीत लोटालोटीची परिस्थिती निर्माण झाली. त्याच गर्दीत दरवाजाजवळून आत जात असताना त्यांना गळा मोकळा वाटल्यामुळे त्यांनी आपली सोनसाखळी तपासली. मात्र साखळी दिसून आली नाही. लगेचच दरवाजाजवळ पाहिले असता, अंदाजे २२ वर्षाचा एक युवक पांढऱ्या शर्टात व काळ्या पॅन्टमध्ये स्थानकाच्या पटांगणातून पळताना दिसला. संबंधित युवकाने गर्दीचा फायदा घेत ही साखळी चोरली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
पाथर्डी शहरातील जुन्या आणि नव्या एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरी जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरटे एसटी प्रवाशांचे मौल्यवान दागिने, पर्स, मोबाइल अशा वस्तू चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक घटना घडूनही गुन्हेगार मोकाट फिरत असल्याने स्थानिक पोलिसांप्रती नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस प्रशासनाकडून तपास करण्यात आला असला तरी परिणामी चोरट्यांची धाडसी मजल दिवसेंदिवस वाढत आहे.या प्रकरणांमुळे पाथर्डीतील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, नवीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. फक्त अवैध धंदे (दारू, जुगार, गुटखा, मावा) यांच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर अशा चोऱ्यांमागील सूत्रबद्ध टोळ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
बस स्थानकांवर ना सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत, ना पुरेशा पोलिसांची उपस्थिती. अशा परिस्थितीत प्रवाशांचे संरक्षण कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




