Friday, February 20, 2026
HomeनगरGold Theft : शिर्डी-पुणे बस प्रवासात महिलेचे ९ लाखांचे सोने लंपास; प्रवाशांमध्ये...

Gold Theft : शिर्डी-पुणे बस प्रवासात महिलेचे ९ लाखांचे सोने लंपास; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

शिर्डी । प्रतिनिधी

शिर्डी-पुणे एसटी बस प्रवासात एका ज्येष्ठ महिलेचे तब्बल ८ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील एअरपोर्ट रोड, श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या सौ. मंदाकिनी सुरेश बोधे (वय ६८ वर्षे) या २ फेब्रुवारी २०२६ रोजी पतीसह नातेवाईकांच्या लग्नासाठी पुण्याला गेल्या होत्या. लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्या धायरी येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होत्या. लग्नात परिधान केलेले स्वतःचे आणि पतीचे सर्व सोन्याचे दागिने त्यांनी एका लाल रंगाच्या बॉक्समध्ये सुरक्षितपणे ठेवले होते. हा बॉक्स त्यांनी कपड्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये व्यवस्थित मध्यभागी ठेवला होता. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या धायरी येथून रिक्षाने वाकडेवाडी एसटी स्थानकावर पोहोचल्या आणि सकाळी ९ वाजताच्या पुणे-धुळे बसने शिर्डीकडे रवाना झाल्या.

YouTube video player

सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिर्डी बसस्थानकावर उतरून त्या घरी पोहोचल्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी प्रवासातील ट्रॉली बॅग उघडून पाहिली असता, दागिन्यांचा तो लाल बॉक्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बॅगची पूर्ण तपासणी करूनही बॉक्स न सापडल्याने आपली चोरी झाल्याची खात्री त्यांना पटली. चोरीला गेलेल्या एकूण १६३.५० ग्रॅम दागिन्यांमध्ये ५० ग्रॅमचे गंठण, ४० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २० ग्रॅमचा राणीहार, ४० ग्रॅमच्या पुरुषांच्या अंगठ्या, २० ग्रॅमच्या स्त्रियांच्या अंगठ्या आणि कर्णफुलांचा समावेश आहे. सरकारी भावानुसार याची किंमत ८ लाख ७० हजार रुपये असली, तरी सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही किंमत १७ लाखांच्या घरात जात आहे.

याप्रकरणी मंदाकिनी बोधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने लबाडीने हे दागिने लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास गांभीर्याने सुरू केला असून, वाकडेवाडी बसस्थानक, शिर्डी बसस्थानक आणि प्रवासाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच बसमधील सहप्रवासी आणि रिक्षाचालकांचीही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

एका ज्येष्ठ महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे शिर्डी शहरात चिंतेचे आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना नागरिक सुरक्षित आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना मौल्यवान वस्तू किंवा दागिने स्वतंत्र लॉक असलेल्या पिशवीत ठेवावेत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. या मोठ्या चोरीचा छडा पोलीस कधी लावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : “अजित दादा म्हणाले होते, छगन भुजबळ राज्यसभेवर…”; अमोल...

0
मुंबई । Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील भीषण निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी...