मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील भीषण निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता विखुरलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांनी वेग घेतला असून, यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेषतः विलिनीकरणानंतर पक्षाची पदे आणि जबाबदाऱ्या कोणाकडे असणार, याबाबत आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले असते, तर अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची अजित पवारांची इच्छा होती. या विधानावर आता स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात देखील एक महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे.
अमोल कोल्हे यांनी सांगितले की, विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान अजित पवारांनी स्पष्ट केले होते की, विलिनीकरणानंतर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवले जाईल. यापूर्वी देखील भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यावेळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, भविष्यातील नियोजनानुसार भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असे कोल्हे यांनी नमूद केले.
छगन भुजबळ यांच्या अस्वस्थतेवर भाष्य करताना कोल्हे म्हणाले की, भुजबळ हे अत्यंत अनुभवी आणि मोठे नेते आहेत. सध्याच्या काळात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा कळीचा ठरत आहे. ओबीसींचा स्वतंत्र कॉलम जनगणनेत असावा ही मागणी जोर धरत असताना, भुजबळांसारखा सामाजिक प्रश्नांची जाण असलेला अभ्यासू नेता संसदेत असणे अत्यंत गरजेचे होते. या मुद्द्यावर अजित दादांशी झालेल्या अंतर्गत चर्चेत भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले होते.
मात्र, सध्याच्या परिस्थितीवर कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्या नेत्याला सामाजिक प्रश्नांची इतकी सखोल जाण आहे, त्यांना राज्यसभेवर न पाठवता, केवळ कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणाऱ्या व्यक्तीला राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होत असेल, तर भुजबळ साहेबांचा त्रागा किंवा त्यांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता यामुळे दुखावला गेला असावा, अशी शक्यताही कोल्हे यांनी वर्तवली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे असून, आगामी काळात विलिनीकरणाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





