Saturday, May 30, 2026
HomeनगरShirdi News : साई मंदिर परिसरात वेषांतर करून चोरी करणारी टोळी गजाआड;...

Shirdi News : साई मंदिर परिसरात वेषांतर करून चोरी करणारी टोळी गजाआड; फरार आरोपींचा शोध सुरू

शिर्डी । प्रतिनिधी 

- Advertisement -

जगप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आंध्रप्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातून आलेल्या या टोळीतील दोन महिला आणि दोन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून महागडे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरात भाविकांची होणारी मोठी लूट टळली आहे.

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक होती. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत असे दिसून आले की, ही टोळी दर अर्ध्या तासाने आपले कपडे बदलून पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देण्याचा प्रयत्न करत असे. टोळीतील महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, मात्र काही वेळातच त्यांनी साड्या परिधान करून पुन्हा परिसरात वावरण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वेषांतर करून भाविकांसारखाच पेहराव करत ते गर्दीत मिसळत होते आणि संधी मिळताच भाविकांचे मोबाईल किंवा पर्स लंपास करत होते.

एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले. शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून संशयितांना घेरले. यावेळी एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र पोलिसांनी अन्य सदस्यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे १० महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चोऱ्यांसाठी वापरले जाणारे ब्लेड्स व कटर सापडले आहेत. विशेष म्हणजे, या टोळीने एका बालकाचाही चोरीसाठी वापर केला असून त्याच्याकडूनही एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कर्नूल येथील सैयद खाजा सैयद समद, गोकुळा कलम्मा आणि मणिकला रमुलाम्मा यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत ही टोळी दोन दिवसांपूर्वीच शिर्डीत दाखल झाल्याचे समोर आले आहे. मंदिर परिसरातील स्नानगृहांचा वापर करून ते तेथेच वास्तव्यास होते. कर्नूलवरून येतानाही त्यांनी काही मोबाईल विक्री केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी माहिती दिली की, सीसीटीव्हीच्या अचूक निरीक्षणामुळे ही टोळी पकडणे शक्य झाले. त्यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अटक केलेल्या आरोपींना आज पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाेकराने लुटले मालकिणीचे घर; साडेतीन लाखांचे दागिने...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik घरकाम करणाऱ्यांवर दाखवलेला अतिविश्वास पुन्हा एकदा महागात पडल्याची घटना नाशिकमधील (Nashik) उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर (Gangapur Road) उघडकीस...