Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : सरकारी जनावरांचे दवाखाने आता उघडणार दोन सत्रात!

Ahilyanagar : सरकारी जनावरांचे दवाखाने आता उघडणार दोन सत्रात!

आता सकाळी 8 ते दुपारी 1.30 अन् दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशा वेळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील पशुधनावर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी वेळेत पशुवैद्यक उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. शेतकरी-पशुपालकांची सोय विचारात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेचारऐवजी आता सकाळी आठ ते दुपारी दीड आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच, अशा दोन सत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, जनावरांच्या दवाखान्यांच्या बदलेल्या वेळांना महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने तीव्र विरोध केला असून पूर्वीप्रमाणे वेळ करण्यात यावी, यासाठी आंदोलन पुकारले आहे.

- Advertisement -

तीनही ऋतूंमधील हवामान व शेतकरी, पशुपालक व शेतमजुरांच्या दिनक्रमाचा विचार करता त्यांना सकाळची वेळ ही पशुधनाची निगा व व्यवस्थापनासाठी सोयीची व महत्त्वाची ठरते. या वेळेत त्यांच्या पशुधनाचा माज, चारा न खाणे, पाणी न पिणे, निस्तेज दिसणे, दूध उत्पादन कमी होणे, मंद हालचाल, शेण व मूत्रातील बदल ही आजारपणाची लक्षणे लक्षात आल्यानंतर तत्काळ उपचारासाठी पशुवैद्यक उपलब्ध व्हायला हवेत. मात्र, राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा 1996 ते 2021 पर्यंत सकाळी सात ते दुपारी 12 व दुपारी चार ते सायंकाळी सहा अशा होत्या. तर जानेवारी 2021 पासून त्यात बदल करून सकाळी नऊ ते दुपारी साडेचार असा करण्यात आला. मात्र, शेतकरी, पशुपालक व शेतमजुरांच्या कामाच्या वेळा व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा यांचा ताळमेळ बसत नसल्याने पशुधनावरील प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सेवेला मर्यादा आली. परिणामी आरोग्य सेवेची संख्या कमी झाल्याचे गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

पशुजन्य उत्पादनाचा वाटा केवळ 2.8 टक्के
राज्यात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या व्यवसायात शेतकरी, पशुपालकांसह शेतमजुरांचेही प्रमाण मोठे आहे. त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाचा विचार केल्यास ते सकाळी नऊपूर्वी कामासाठी शेतात जातात. पशुपालनाद्वारे मिळणारे उत्पन्न हे त्यांच्या उत्पन्नात वाढ करणारे महत्त्वाचे घटक असले तरी शेतीकाम व मजुरी हेही त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांची वेळ सकाळी नऊनंतरची असल्याने त्यांच्या पशुधनावरील उपचारासाठी त्यांना शेतकाम व मजुरी बुडवून थांबावे लागत होते. त्याचा त्यांच्या अर्थार्जनावर परिणाम होत होता. शिवाय आरोग्य सेवेला आलेल्या मर्यादेचा राज्याच्या पशुजन्य उत्पादनालाही बसल्याचे दिसते. 2024-25 च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत पशुजन्य उत्पादनाचा वाटा केवळ 2.8 टक्के इतका आहे. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता कमी असून त्यामागे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेतील बदल हे कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेळेत बदल करण्याचा आदेश राज्य सरकारने 28 फेब्रुवारी रोजी काढला आहे.

या सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश
कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आकस्मिक प्रसंगी पशुपालकांना 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थाप्रमुखांची राहील. तसेच दुपारच्या मधल्या सत्रात दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांत योजनांविषयक प्रचार, प्रसिद्धी, प्रशिक्षण, मार्गदर्शन व तांत्रिक कामकाज करावे. कार्यालय प्रमुख व कर्मचार्‍यांनी आठवड्यातून एकदा कार्यक्षेत्रातील गावात किमान एकदा भेट द्यावी. गावात भेटीला जाण्यापूर्वी त्याची सूचना द्यावी, भ्रमणध्वनी क्रमांक दवाखान्याच्या दर्शनी भागी लावावा. ग्रामसभेला उपस्थित राहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या योजनांची माहिती द्यावी, असे आदेश राज्याच्या पूशसंवर्धन विभागाने काढले आहेत.

ताज्या बातम्या

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार – महसूल मंत्री...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत...