नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे आंबटशौकिनांना चांगलाच दणका बसला आहे. उल्लू अॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या सेमी पॉर्न प्रसारित करणाऱ्या अॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. आता त्याच धर्तीवर आणखी २५ ओटीटी अॅप्स आणि वेबसाइट्सवर कारवाई करत त्यांना ब्लॉक केले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, हे प्लॅटफॉर्म्स सातत्याने अश्लील, असभ्य आणि महिलांचे आक्षेपार्ह चित्रण करणारी सामग्री प्रसारित करत होते. या प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्यासाठी अनेक दिवसांपासून विविध स्तरांवरून मागणी होत होती. अखेर सरकारने यावर कठोर पाऊल उचलले आहे.
भारतात कोरोना काळात पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखविण्यास विविध कंपन्यांनी सुरुवात केली होती. यात उल्लू अॅप, एएलटीटी सारख्या अॅप्सनी धुमाकूळ घातला होता. तरुण वर्गासह सर्वच वयोगटाला या अॅप्सनी भुरळ घातली होती. यामुळे तरुण पिढी देखील बिघडत चालली होती. याला आवर कसा घालावा, असा प्रश्न केंद्र सरकारसमोर होता. यावर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने या ॲप्सवर घातली बंदी
सरकारने बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix आणि Triflicks या अॅप्सचा समावेश आहे.
या सर्व ओटीटी प्लॅटफोर्मवर आयटी कायद्याच्या कलम 67 आणि कलम 67 A आणि कलम 294 च्या महिलांच्या अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे नियमन करण्याच्या आणि ऑनलाइन अश्लील सामग्रीचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





