राहाता |वार्ताहर| Rahata
तालुक्यातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्ध योजना आणि इंदिरा गांधी विधवा योजना या योजनांअंतर्गत तालुक्यातील 14,822 लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा एकूण 2 कोटी 22 लाख 33 हजार रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.
योजनांची अंमलबजावणी तहसीलदार अमोल मोरे, महसूल नायब तहसीलदार बी. बी. मुळे आणि अव्वल कारकून सोमनाथ कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे केली जाते. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रकरणे प्राधान्यक्रमाने हाताळली जातात आणि लाभ तातडीने दिला जातो. एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 1082 प्रकरणे मंजूर करण्यात आली होती.
2024 ते 2025 या आर्थिक वर्षात 329 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. एप्रिल 2025 ते 23 जून 2025 या अल्पकालावधीत नवीन 333 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांची प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी तहसील कार्यालयातील सहाय्यक सुहास बनसोडे आणि अमोल फोफसे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
विभागानुसार निधीचे वितरण
संजय गांधी निराधार योजना: 643 लाभार्थ्यांना प्रति महिना 96 लाख 79 हजार पाचशे रुपये, श्रावण बाळ निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी वृद्ध योजना: 2393 लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 35 लाख 89 हजार रुपये, इंदिरा गांधी विधवा योजना 156 लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा दोन लाख 34 हजार रुपये या योजनांद्वारे दरमहा एकूण 2 कोटी 22 लाख 33 हजार रुपये जमा होत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये मिळतात.
दिलेल्या आश्वासनाची सातत्याने पूर्तता करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील हे कायम पाठपुरावा करतात. यामुळे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे दरमहा 14 हजार 822 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 कोटी 22 लाख 33 हजार रुपये नियमित जमा होतात. वार्षिक रक्कम 26 कोटी 67 लाख 96 हजार रुपयांवर जाते. यामुळे लाभार्थी वर्ग समाधानी आहे.
– गोपीनाथ गोंदकर, चेअरमन, शिर्डी सोसायटी




