Friday, May 3, 2024
Homeराजकीयनिवडणुकीसाठी तेल लावलेले पैलवान मैदानात

निवडणुकीसाठी तेल लावलेले पैलवान मैदानात

करंजी |वार्ताहर| Karnaji

पाथर्डी तालुक्यात 78 ग्रामपंचायती रणधुमाळी आता रंगात येवून लागली असून या रणधुमाळीत बिबट्याचा आवाज मात्र गुल झाला आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून तेल लावलेले पैलवान आता मैदानात उतरू लागला आहेत. यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून गावागावात गावगुंडीला सुरूवात झाली आहे. यातू न एकमेकांची उणीदुणी निवडणुकीच्या निमित्ताने निघणार असून अनेकजण मागचे हिशोब देखील चुकते करण्याच्या तयारीत असल्याने गाव पातळीवरील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघणार आहे.

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता निवडणूक कार्यक्रम लागल्याने त्या -त्या गावात धुमशान रंगू लागले आहे.

15 जानेवारीला मतदान होत असून यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झालेली आहे. येणार्‍या 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 4 जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून गाव पातळीवर निवडणुकांचे धुमशान सुरू होणार आहे.

गावात दोन ते तीन गट असतील तर त्या ठिकाणी समस्या आणखी जटील होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी सरपंचाची निवड ही लोकांमधून करण्यात आली होती. आता ती पद्धत रद्द करून सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार आहेत. निवडणुका बिनविरोध झाल्या तर सदस्य निवडीचा अधिकार मतदारांना राहणार नाही, ही भीती देखील काही जणांच्या मनात आहे.

गावागावात आता मोर्चेबांधणी सुरू झाली असून राजकारण तापू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांसह गावपातळीवरील नेते मंडळीकडून निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू आहेत. त्याअनुषंगाने पॅनल तयार करणे, जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार निश्चित करण्याच्या कामात गावपातळीवरील नेतेमंडळी गुंतली आहे. त्यासाठी वाड्या-वस्त्यांवर गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे वातावरण निर्मिती, उमेदवार चाचपणी, मतदारांच्या गाठीभेटी, गावातील भावबंद यांच्या मदतीच्या खात्रीसाठी बोलणी सुरू झाल्याने सध्या गावपातळीवर राजकीय चर्चांना ऊत आल्याचे दिसून येत आहे. काही गावात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न देखील सुरु आहेत. चांगले उमेदवार देऊन वार्डात विजय कसा मिळवता येईल यादृष्टीने देखील नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत.

अर्ज दाखल होऊ लागले असून रिंगणात उतरण्यासाठी गावागावातील अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत सहभाग घेण्याची व निवडणुकांमध्ये पुर्ण तयारीनिशी उतरण्याची जोरदार तयारी तरुण वर्गाची झाल्याची पहायला मिळत असल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच गावासह वाड्या-वस्त्यांवर बैठका, चर्चासत्र, कार्यकत्यांची एकमेकांकडे रात्री उशीरपर्यंत उठ-बस सुरू झाल्याने बिबट्याचा आवाज गुल झाल आहे. सध्या तालुक्यात कोठेच बिबट्या दिसल्याचा आवाज नाही. यामुळे तालुक्यातील जनतेचे लक्ष आता राजकारणातील बिबट्यांकडे लागले असून कोण कोणाची शिकार करणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या