अहिल्यानगर । सचिन दसपुते
शिर्डी, राहाता परिसरासह राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटी रूपयांची फसवणूक करून पैसे बुडविणार्या ‘ग्रो मोअर’ या कंपनीविरोधात शिर्डी, राहाता पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेने राहाता येथील एमपीआयडी विशेष न्यायालयात दाखल केले आहे. मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याच्याविरूध्द हे दोषारोपपत्र दाखल केले असून इतर पसार असलेल्या आरोपींविरूध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे.
दरम्यान, पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक ‘मनीट्रेल’ अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कोणत्याही प्रकारची खात्री न करता, केवळ दरमहा जास्त परताव्याच्या आमिषाने कंपनीत पैसे गुंतवल्याचा तपासात उल्लेख आहे. कंपनीकडे सेबीचे कोणतेही स्टॉक ब्रोकर लायसन्स नव्हते.
तरीही गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधून दरमहा आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. कंपनीने गुंतवणूकदारांच्या नावाने ‘डिमॅट’ खातेही न उघडता संचालकांनी स्वतःच्या नावाने खाते उघडून व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्टॉक ब्रोकरचे आमिष, खोटे आश्वासन आणि चौकशी न करता केलेली गुंतवणूक यामुळे शेकडो कोटींचे भवितव्य अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे.
गुंतवणुकीवर दरमहा चांगला परतावा मिळेल या आमिषाने नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भूपेंद्र सावळे व त्याच्या साथीदारांविरूध्द राहाता व शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करत असताना गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ करण्याचा निर्णय घेतला. या ‘मनीट्रेल’चा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिस प्रा. लि.चे उद्दिष्ट आर्थिक व गुंतवणूक सल्लागार, वित्तीय व्यापार, वित्तदलाल आणि स्टॉक ब्रोकर सेवा असे नमूद आहे. मात्र, यासाठी आवश्यक असलेले ‘सेबी’चे अधिकृत स्टॉक ब्रोकर लायसन्स, इक्विटी-डेरिव्हेटिव परीक्षा प्रमाणपत्र, तसेच स्टॉक एक्सचेंजची मान्यता यापैकी कोणतीही अट कंपनी किंवा संचालक मंडळाने पूर्ण केलेली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कंपनीने स्टॉक ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रूपयांची रक्कम जमा करून, परतावा न देता फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या नावाने ‘डिमॅट’ खाते उघडणे आवश्यक असताना, संचालकांनी स्वतःच्या नावाने ‘डिमॅट’ खाती उघडून त्यात गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंतवणूकदारांची जमा रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याऐवजी संशयित आरोपींनी त्यातून महागडी वाहने, सोन्याचे दागिने, एलआयसी पॉलिसी, मुदत ठेवी, तसेच स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे ‘मनीट्रेल’मध्ये स्पष्ट झाले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही पसार आरोपी गुंतवणूकदारांमध्ये सोशल मीडियाव्दारे संदेश पाठवून संभ्रम निर्माण करत आहेत. जे आमच्या विरोधात तक्रार देतील त्यांना पैसे परत मिळणार नाहीत, असे संदेश पाठवून गुंतवणूकदारांना जबाब न देण्यासाठी बाध्य केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दोषारोपपत्रात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. गुंतवणूकदार जबाब देण्यासाठी येत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहे.
एकच अटकेत, इतर मोकाट
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून भूपेंद्र सावळे याला नंदुरबार पोलिसांच्या अटकेनंतर अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. मात्र, त्याव्यतिरिक्त एकाही संशयित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपासात भूपेंद्र सावळे व्यतिरिक्त सात संशयित आरोपी निष्पन्न झाले असून पुढील तपासात आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुरेशा प्रमाणात प्रयत्न न केल्याचा आरोप गुंतवणूकदारांमध्ये केला जात आहे. गुन्ह्याचा तपास कामाचा व्याप असल्याचे कारण देऊन धीम्या गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, आरोपींच्या दडपशाहीमुळे अनेक गुंतवणूकदार जबाब देण्यासाठी पुढे येत नसल्याचे जाणवत आहे.
चौकशी न करता गुंतवणूक
दरमहा मोठा परतावा मिळेल या आमिषाने गुंतवणूकदारांनी भरमसाट रक्कम कंपनीत गुंतवली. कंपनीची पार्श्वभूमी, कायदेशीर दर्जा, गुंतवणुकीची सुरक्षितता याबाबत कोणतीही चौकशी न केल्याने आज हजारो गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रूपये अडकून पडले आहेत. हे पैसे किती, केव्हा आणि कशा प्रकारे परत मिळणार याबाबत निश्चित माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही. दुसरीकडे आपले पैसे गुंतले असतानाही गुंतवणूकदार पोलिसांकडे जबाब देण्यासाठी येत नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराला आपले पैसे परत मिळतील अशी अशा आहे तर त्यांनी जबाब देण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.




