अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ भागात शेजारच्या तालुक्याच्या हद्दीतून नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली आहे. पालकमंत्री यांनी देखील यात लक्ष घालावे, अशी मागणी राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी केली. त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या वाळूधोरणानुसार नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरू असल्यास संंबंधीतांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित जिल्हा नियोजनच्या ऑनलाईन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ भागात शेजारच्या तालुक्यातून सुरू असणार्या वाळू उपशाचा विषय उपस्थित केला. तसेच पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात वाळू उपशावर बंदी असतांना त्याबाबतचा शासन निर्णय असतांना वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. त्यांनी राज्य सरकारच्या वाळू धोरणानुसार संबंधीतांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी यांनी त्यावर अंमलबाजवणी करावी, असे ना. विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील पाणी योजनाच्या थकीत वीज बिलापोटी त्यांचे कनेक्शन तोडण्यात येत आहे. यामुळे पाणी योजनांसाठी सौर योजना राबवावी, अशी मागणी तनपुरे यांनी केली. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी राज्य सरकारचे पाणी योजनांबाबतचे धोरण सौरचे आहे. महावितरणने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या. नगर तालुक्यात वीजेच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श होवून एका शेतकर्याचा मृत्यू झाला. याबाबत संबंधीत शेतकर्यांने महावितरणच्या अधिकार्यांना तुटलेल्या तारांबाबत एक दिवस आधी कळवले होते. मात्र, महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संबंधीत शेतकर्याचा जीव गेला. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. तनपुरे यांनी केली. पालकमंत्री विखे पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्यांना असा प्रकार पुन्हा घडू नयेत आणि झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.
दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई
जिल्ह्यात विकास कामे पूर्ण करून त्यांचा दर्जा राखण्याची जबाबदारी ठेकेदार यांच्यासह संबंधीत कामावर नियंत्रण ठेवणारे उपअभियंते आणि विभाग प्रमुख यांची देखील आहे. यामुळे निकृष्ठ दर्जाची कामे झाल्यास संबंधीत ठेकेदार यांच्यासह बांधकाम विभागातील यंत्रणेसह संबंधीत विभागाचे विभाग प्रमुख यांना दोषी धरण्यात येईल, असा इशारा ना. विखे पाटील यांनी दिला. अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्जाबाबत आ. लहामटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी ना. विखे बोलत होते.
विनाकारण सरकारची बदनामी – आ. राजळे
गेल्या दोन वर्षात महायुतीच्या सरकारच्या काळात शेवगाव-पाथर्डीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झालेली आहेत. यात रस्ते, यासह अन्य विकास कामांचा समावेश आहे. मात्र, कामांच्या दर्जाचा प्रश्न असून लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे ठेकेदारांच्या निकृष्ठ कामामुळे विरोधकांना आयती संधी मिळत आहे. यात विनाकारण सरकारची बदनामी होत असल्याने विकास कामांचा दर्जा राखण्यात यावा, अशी जोरदार मागणी आ. मोनिका राजळे यांनी केली. नगर पालिकेच्या निधीच्या विषयावर त्यांनी चर्चा केली.