आश्वी |वार्ताहर| Ashwi
राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य, महिला, शेतकर्यांपर्यंत अनेक योजना पोहोचत असून खर्याअर्थाने हे सरकार लोकहितकारी आहे. तर मालुंजे, भोजदरी यांच्यासह संगमनेर तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून प्रभावीपणे विकासाला चालना मिळत असल्याने आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल, अशी मिश्कील टिप्पणी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले, मालुंजे व परिसरातील गावे ही दुर्लक्षित होती. आपल्या सान्निध्यात आल्यापासून पेयजल योजना, रस्ते आदींसह विविध विकासकामांना चालना मिळू लागली. यापूर्वी झालेल्या रस्त्यांना त्वरीत खड्डे पडत असल्याचे दिसले. कारण ठेकेदार हे घरातीलचं असायचे. आता तसे राहिले नाही. महायुतीच्या काळात सर्वांना काम करण्याची संधी देण्यात आल्याने चांगली व स्वच्छ पद्धतीने कामे होवू लागली.
यात विविध विभागाच्या अधिकार्यांचीही तप्तरता दिसून येत असून तालुक्यातील भोजापूर पाणी पूजनासह विविध नऊ ठिकाणी कार्यक्रम असल्याने आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल व विकासात्मक घोडदौड करावी लागेल असे विखे पाटील शेवटी म्हणाले. विशेष म्हणजे महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करून महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे, अशी भावना महिला भगिनी राखी बांधून व्यक्त करताना दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.