राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
पत्नीस मुलाकडे राहण्यासाठी जाण्यास विरोध करून केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे घडली होती. याबाबत आरोपी पतीस जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर घटनेची हकिगत अशी,मयत महिलेची फिर्यादी मुलगी बाली काळू निकम, रा. गुंजाळे, ता. राहुरी ही तिचे कुटुंबासह वरील ठिकाणी राहत होती. तिच्या घराजवळच तिची आई मयत अलकाबाई व वडील वसंत लक्ष्मण शिंदे हे कोपी करून राहत होते. घटनेच्या आधी दि. 16 ऑॅगस्ट 2021 रोजी अलकाबाई ही तिची मुलगी बाली हिचेकडे येऊन तिला सांगितले होते की, मला माझे मुलाकडे बांगर्डे येथे राहण्यासाठी जायचे आहे.
परंतु तुझे वडील मला जाऊ देत नाही व दारू पिवून येऊन माझ्याशी भांडण तंटा करतात. त्यानंतर दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे हे मुलगी बाली निकम हिच्या घरी येऊन तुझी आई मुलाकडे बांगर्डे येथे रहायला जायचे म्हणत होती. परंतु, मी तिला जाऊ दिले नाही. आमचे दोन तीन दिवसांपासून भांडणे चालू आहेत. मी तिला त्या कारणामुळे मारहाण केली असून त्या मारहाणीत तिला कपाळाला, डोक्याला व छातीला मार लागलेला आहे. तेव्हापासून ती उठत नाही. जेवण करीत नाही. तू तेथे जाऊन बघ. असे सांगून आरोपी निघून गेला. त्यानंतर मुलीने आई-वडील राहत असलेल्या कोपीजवळ जाऊन आईस आवाज दिला. परंतु आवाज न आल्याने तिने कोपीत पाहिले असता आई झोपलेल्या अवस्थेत होती व तिच्या डोक्याला मार लागलेला होता. तोंडाला रक्त दिसले. तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती उठत नव्हती.
ती मयत झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी मोठ्याने रडू लागली. तिथे लोक जमा झाले व पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीसही घटनास्थळी आले. सदर घटनेनंतर मुलगी बाली निकम हीने राहुरी पोलीस स्टेशनला जावून तिच्या वडिलांविरूध्द रितसर फिर्याद दिली. सदर आरोपी विरुध्द भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला व तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. सदर खटल्याची चौकशी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.व्ही. सहारे यांच्या न्यायालयात झाली. सदर या खटल्यात फिर्यादी सरकारच्यावतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी तसेच तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
सदर प्रकरणात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना पो. हे. कॉ. विकास साळवे, पो.कॉ. रोहित पालवे व पो.कॉ. योगेश वाघ यांनी तपासात मदत केली. सदर खटल्यामध्ये मयताचा मृत्यू हा आरोपीच्या ताब्यात असताना झाला. तसेच आरोपीकडून रक्ताने भरलेले कपडे भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे जप्त केले होते. तो पुरावा तसेच रासायनिक अहवाल, मयताने मृत्यू पुर्वी फिर्यादीस सांगितलेली घटना या गोष्टी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे (वय 52 वर्षे), रा. गुंजाळे, ता. राहुरी, जि. अहमदनगर याला दोषी धरून भा.दं.वि. कलम 302 अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात सहा. फौ. विलास साठे यांनी सहकार्य केले.