अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 46 हजार 300 रूपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू व 5 लाखाची कार असा एकुण 8 लाख 46 हजार 300 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला ताब्यात घेतले असून दोघे पसार आहेत.
प्रशांत प्रभाकर आव्हाड (वय 36, रा. दापुर, ता. सिन्नर, जि. नाशिक), प्रभाकर गुळवे (रा. साकुर, ता. संगमनेर) व सलिम सय्यद (रा. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (25 नोव्हेंबर) सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास भिंगार नाल्याजवळील रस्त्याच्याकडेला सापळा रचला. त्यावेळी वॅगनर (एमएच 15 एचएम 2178) कारमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची तस्करी सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी विमल गुटख्याचे एक हजार 606 पुडे आणि व्ही-1 सुगंधी तंबाखूचे एक हजार 372 पुडे असा एकूण 3 लाख 46 हजार 300 रूपयांचा साठा, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली 5 लाख रूपये किमतीची कार असा एकूण 8 लाख 46 हजार 300 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी प्रशांत प्रभाकर आव्हाड याला ताब्यात घेण्यात आले असून, प्रभाकर गुळवे आणि सलिम सय्यद हे दोन संशयित पसार झाले आहेत. मानवी शरीरास अपायकारक पदार्थांची विक्री करण्याचा उद्देशाने हा साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीसी उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.




