पुणे । Pune
हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, तुम्ही विधानसभा लढवा असा लोकांचा आग्रह असल्याचं पवार साहेब बोलले. शरद पवार यांनी मला म्हटलं की जनतेचा आग्रह असेल तर निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घ्या आणि बाकीच्या गोष्टींची जबाबदारी माझ्यावर राहील असं पवार साहेबांनी सांगितलं.
आपण राष्ट्रवादीत प्रवेश करायचा की नाही हे ठरवण्याआधी मी शरद पवारांना भेटण्याआधी फडणवीसांना भेटलो. त्यांच्याशी दीडदोन तास चर्चा झाली. त्यांनी काही प्रस्ताव ठेवले, भूमिका मांडली. मी माझी भूमिका मांडली, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर माझ्या भूमिकेवर चर्चा झाली. तिथं बोलणं झाल्यानंतर पुन्हा शरद पवार यांच्यासोबत माझी भेट झाली असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
आपण निर्णय घ्यायचा आणि तो शरद पवारांना कळवायचा. त्यापुढचा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात मी जाणार नाही. ज्यावेळी या तालुक्यात राजकीय निर्णय झाले आहेत ते जनतेच्या आग्रहामुळे झाले आहेत असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निर्णय झाले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती आता होते आहे. १९९५ ला तुम्हीच आग्रह केला होता की बंडखोरी करा. त्यावेळी मी बंडखोरी केली. त्यावेळी जनतेच्या आग्रहामुळे आणि मतांमुळे मी निवडून आलो असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
त्यानंतर तुम्ही म्हणालात काँग्रेसमध्ये जा की काँग्रेसमध्ये जा. त्यानंतर तुम्हीच आग्रह केलात म्हणून २०१९ ला भाजपात गेलो. दुर्दैवाने ती निवडणूक जिंकता जिंकता हरलो. इंदापूर तालुक्याला अपयश पहावं लागलं. मागच्या १० वर्षांत ज्या ज्या ठिकाणी राडे झाले, समाजांमध्ये तेढ निर्माण झाली हे आपण पाहतोय. असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.