अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसाच्या, अतिवृष्टीची दैनदिन आकडेवारी जसजशी संकलित होत आहे, तशीतशी शेती पिकांच्या नुकसानीची व बाधित शेतकर्यांचा आकडा वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 ते 29 सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यातील अकोले वगळता उर्वरित सर्व तालुक्यात 1 हजार 291 गावातील 8 लाख 29 हजार 66 शेतकर्यांचे 5 लाख 65 हजार शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली आहे. यामुळे यंदा परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांसह शेतकर्यांची वाट लावली असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून अतिवृष्टी सुरू आहे. यात अकोले वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील जवळपास 45 टक्के पिके वाया गेली असून यंदा शेतकर्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवर सर्वाची मदार राहणार आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात 33 हजार 338 शेतकर्यांचे 20 हजार 34 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी तर 7 लाख 95 हजार 728 शेतकर्यांचे 5 लाख 44 हजार 998 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.
जिल्ह्यात नगर तालुक्यात 117 गावातील 76 हजार 775 शेतकर्यांचे 56 हजार 15 हेक्टवर, पारनेर 130 गावे, 95 हजार 102 शेतकर्यांचे 59 हजार 709 हेक्टर, पाथर्डी 137 गावातील 1 लाख 1 हजार 580 शेतकर्यांचे 77 हजार 155 हेक्टरवर, कर्जत 119 गावातील 47 हजार 484 शेतकर्यांचे 30 हजार 606 हेक्टरवर, जामखेड 87 गावातील 49 हजार 936 शेतकर्यांचे 34 हजार 323 हेक्टरवर, श्रीगोंदा 105 गावातील 68 हजार 435 शेतकर्यांचे 38 हजार 498 हेक्टरवर, श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावातील 55 हजार 865 शेतकर्यांचे 35 हजार 293 हेक्टरवर, राहुरी 96 गावातील 50 हजार 167 शेतकर्यांचे 44 हजार 538 हेक्टरवर, नेवासा तालुक्यातील 127 गावातील 73 हजार 727 शेतकर्यांचे 43 हजार 723 हेक्टरवर, शेवगाव तालुक्यातील 113 गावातील 89 हजार 687 शेतकर्यांचे 60 हजार 995 हेक्टरवर, संगमनेर तालुक्यातील 64 गावातील 14 हजार 719 शेतकर्यांचे 11 हजार 368 हेक्टरवर, कोपरगाव तालुक्यातील 80 गावातील 45 हजार 872 शेतकर्यांचे 33 हजार 40 हेक्टरवर आणि राहाता तालुक्यातील 61 गावातील 59 हजार 717 शेतकर्यांचे 40 हजार 66 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे आणि क्षेत्राचे जवळपास 45 टक्के पंचनामे झालेले असून सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला वेग येणार आहे.





