पुणे | Pune
राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बऱ्याच भागांत पाणी भरले आहे, पिकं पाण्याखाली गेली आहेत, लोकं अडकून पडली आहेत. शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पावसाचा आढावा घेतला आहे.
शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील पूरस्थितीबाबत सविस्तर भाष्य केले. “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सोयाबीन हे भरवश्याचे पीक असते. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिले आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून येणारे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही. ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असतो, तिकडे झाली आहे”, असे शरद पवारांनी सांगितले.
ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यात कामी पाऊस असतो त्या जिल्ह्यात पाऊस पडतोय. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद परभणी नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. असे संकट जेव्हा येते तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याला सहाय्य करण्याची योजना केंद्र सरकारमध्ये आहे. त्या योजनेची राज्यामार्फेत अंमलबजावणी केली जाते. राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण गरजेचे आहे असे शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले, ही नुकसान भरपाई कशाची असते, एक पीक, दोन गुरेढोरं आणि तिसरे जमीन वाहून गेली. पीक वाया गेले तर फक्त त्यावर्षी नुकसान होते. पण जमिनीवरची माती वाहून गेली तर त्यामधून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करुन, पीक गेले म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यासाठीही मदत करावी लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, गुरं वाहून गेली. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पहिल्यांदा पंचनामे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरुपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




