Thursday, June 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

अनेक जिल्ह्यांना यलो तर कोकणात ऑरेंज अलर्ट

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्यातील अनेक भागात मान्सूनचे ढग दाटले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असणार आहे. मुंबई आणि गोवा किनारपट्टीवरही ढगांची दाटी झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत सक्रीय आहे. उत्तर बंगालचा उपसागर आणि बांगलादेशात समुद्र सपाटीपासून 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वार्‍यांची स्थिती कायम आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. राजस्थान पासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

कोकण, गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मान्सूनची उत्तरी सीमा कायम आहे. पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात पाऊस पडला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण कायम असून मध्येच काही काळ ऊनही पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे परिसरातील कमाल आणि किमान तपमानात घट झाली आहे. हवेत गारवा असल्यामुळे उकाडा पूर्णत: कमी झाला आहे. पुढील दोन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यातील घाट विभागात मात्र जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
उद्या (शुक्रवारी) मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाला अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट
तळ कोकणात मागील तीन दिवसांपासून मान्सून सक्रीय आहे. त्यामुळे विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (शुक्रवारी) रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही भागात वादळी वारे वाहणार असल्याचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ICC Women’s T20 World Cup 2026 : IND Vs BAN :...

0
मँचेस्टर | वृत्तसंस्था आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने बांग्लादेशवर दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा अधिक बळकट केल्या....