Wednesday, July 29, 2026
HomeनगरRahata : नगर-नाशिकवरील समन्यायीचे संकट टळले

Rahata : नगर-नाशिकवरील समन्यायीचे संकट टळले

अखेर जायकवाडीत 65 टक्के पाणीसाठा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे.
काल रात्री 9 वाजता जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 49.4 टीएमसी इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 75.50 टीएमसी इतका झाला. हे धरण रात्री 9 वाजता 64.47 टक्के झाले. 35551 क्युसेकने पाण्याची आवक धरणात होत होती. रात्री उशिरा जायकवाडी धरणातील पाणीसाठा 65 टक्के झाला. त्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातून समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची नामुष्की टळली आहे.

- Advertisement -

जायकवाडीची एकुण पाणी साठवण क्षमता 102.73 टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 76.67 टीएमसी आहे. या पार्श्वभूमिवर समन्यायी कायद्यानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे. गेल्या सलग आठ वर्षात, सन 2023 चा अपवाद वगळता, समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही. यावर्षी अंदमान समुद्रात 20 मे ऐवजी 16 मे रोजीच आगमन झाले होते आणि केरळमध्ये 26 मे ला आगमन होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तो 4 जुनला केरळात दाखल होऊन तळकोकणात 6 जुनला आला. परंतु नंतर त्याची वाटचाल मंदावल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सिंचनाची चालु आवर्तने बंद करण्यात आली. 21 जुननंतर कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर मान्सुनने हळूहळू जोर पकडला. जुलैच्या सुरवातीला आणि उत्तरार्धात विस्तृत क्षेत्रात पाऊस होऊन खरीपाच्या पेरण्या मार्गी लागल्या. विशेष म्हणजे कोकणपट्टी आणि सह्याद्री घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली असली तरी उर्वरित भागात अत्यल्प पाऊस पडला आहे.

गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधार्‍यावरुन 30 टीएमसी तसेच प्रवरा नदीत ओझर बंधार्‍यावरुन 1.5 टीएमसी असे एकुण 31.5 पाणी आजपर्यंत जायकवाडीकडे वाहुन गेले आहे. 28 जुलैला सायंकाळी 6 वाजता नांदुर मधमेश्वर बंधार्‍यावरुन 25925 क्युसेक तसेच ओझर बंधार्‍यावरुन 5661 क्युसेक प्रवाह वाहत आहे. गोदावरी नदीतील कमालपूर बंधार्‍यातून 36666 क्युसेक तसेच प्रवरा नदीतील मध्यमेश्वर (नेवासा) बंधार्‍यातून 9756 असे एकुण 46422 क्युसेक्स पाण्याची जायकवाडी धरणात आवक होत आहे. जायकवाडीत चोवीस तासांत सरासरी 3 टीएमसी पाणी येत आहे. धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने तयार केलेल्या धरण जलाशय परिचालन सुचीप्रमाणे दर महिन्याच्या प्रत्येक पंधरवड्यात एकुण क्षमतेच्या अपेक्षित टक्के असलेला पाणीसाठा धरणात साठवून ठेऊन उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टी होत असली तरी घाटमाथा परिसर वगळता नगर – नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. सरासरी पावसाच्या केवळ 40% च्या आसपास पाऊस झाला असुन त्यावर खरिपाच्या बहुतांश पेरण्या झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात पावसाचा दिर्घकालीन खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसला. सध्या हलक्या स्वरुपात जेमतेम पाऊस पडल्याने पिकांना काही दिवसासाठी तरी जीवदान मिळाले आहे. त्यामुळे या भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मोठा पाऊस न झाल्याने भुजलपातळी वाढली नाही परीणामी विहीरीतील पाण्याने तळ गाठला आहे. समन्यायीप्रमाणे जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. त्यामुळे गोदावरी, प्रवरा तसेच निळवंडे कालव्यांना सुध्दा पाणी सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे.

अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री घाटमाथ्यावर जुलैच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस पडला. जुन महिन्यात मान्सूनची गती मंदावून विलंब झाल्याने दुष्काळाचे मळभ दाटले होते. परंतु नंतर घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे घाटमाथ्यावरील धरणे ओव्हरफ्लो होऊन जायकवाडीचा जिवंत पाणी साठ्यात वेगाने वाढ झाली. 28 जुलैला रात्री उशिरा तो 50 टीएमसी म्हणजे 65 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे यावर्षी समन्यायीप्रमाणे जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यापूर्वी सन 2012 पासुन 2026 पर्यंतच्या 15 वर्षात 2012,2013,2014,2015, 2018 आणि 2023 मध्ये पाणी सोडण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे सह्याद्री घाटमाथा व परिसर वगळता अहिल्यानगर व नाशिकच्या पर्जन्यछायेतील असलेल्या उर्वरीत भागात अद्यापपर्यंत सरासरीच्या केवळ 40 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यावर खरीपाची पिके जेमतेम येतील. सध्या भुजलपातळी खालावलेलीच आहे. त्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांद्वारे लाभक्षेत्रात सोडले तर भुजलपातळी वाढण्यास मदत होईल आणि त्याअनुषंगाने रब्बी व उन्हाळ हंगामातील पिकांचे सुयोग्य नियोजन करता येईल.
– उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नेवासा, श्रीरामपूरच्या वजनदार नेत्यांसोबत सभापती शिंदे करणार चर्चा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरूवात होताना दिसत आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी...