अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणार्यांची प्रवृत्ती शोधली पाहिजे. त्यांना मारणारे हात वेगळे असतील व त्यांच्यामागे काही अदृश्य हातही असू शकतात. त्यामुळे मारणार्यांचे बोलवते धनी कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी सखोलपणे घ्यावा, अशी मागणी निर्भय बनो अभियानाचे प्रमुख विश्वंभर चौधरी यांनी बुधवारी येथे केली. दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही हेरंब कुलकर्णी यांना अजूनही पोलीस संरक्षण दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
हेरंब कुलकर्णी व त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी यांना मागील शनिवारी सावेडीत रॉडने मारहाण झाली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांसह एका अल्पवयीन मुलाला पकडले आहे. कुलकर्णींना झालेल्या मारहाणीचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, चौधरी यांनी बुधवारी हेरंब कुलकर्णींची भेट घेतली व त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, अशोक सब्बन, नितेश बनसोडे, अॅड. श्याम असावा, चंद्रकांत पालवे, गणेश भगत, संध्या मेढे, प्रा. मेहबूब सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, शाळांच्या परिसरात तंबाखू व गुटखा विक्रीला बंदी असल्याचा कायदा सरकारनेच केला आहे व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही सरकारची आहे. पण ती होत नसेल तर हा कायदा रद्दच केलेला बरा. शालेय धोरणात शाळांच्या परिसरात दारूची दुकानेही नकोत. पण त्यावर सरकारची देखरेख नाही. सर्रास दुकाने सुरू असून, उलट हप्ते खाण्याची संधी म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे तुम्हाला पिढ्या बिघडवणे चालणार असेल व गुंड पोसण्यासाठी गुटखा विक्री पाहिजे असेल तर कायदाच रद्द केला जावा, अशी मागणीही चौधरींनी केली.
शासनाच्याच कायद्याच्या आधारे हेरंब कुलकर्णींनी धाडस करून व शत्रूत्व घेऊन तक्रारी केल्या व पोलिसांची मदत घेऊन शाळेजवळच्या गुटखा टपर्यांची अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न केला व गुटख्याच्या विळख्यातून शालेय विद्यार्थ्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे सांगितले जात असले तरी आता दिसते तसेच हे आहे का, हे तपासले पाहिजे. या घटनेमागचे धागेदोरे शोधले पाहिजे. याच कारणाने मारहाण झाली का अन्य काही कारणाने, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. यामागे नेमके कोण आहेत व अन्य काही कारण आहे का? याचा शोध घेताना कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करणार्यास मारहाण होणे हे गंभीर आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. सामान्यांविषयी तळमळ असलेल्यास मारहाण होत असेल तर यापुढे कोणीही सामान्यांचा आवाज होण्यास पुढे येणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
गृहमंत्री…प्रशिक्षण द्या
जखमी अवस्थेतील हेरंब कुलकर्णींना पोलीस ठाण्यात चार तास बसवून ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण घेऊन आपल्या हद्दीत कोणते नामांकित कार्यकर्ते राहतात, कोण सामाजिक काम करते, याची माहिती ठेवण्यास त्यांना भाग पाडावे. पोलिसांना आपल्या गावातील महत्त्वाची माणसे कोण, हेच माहिती नाही. त्यामुळे ते ड्युटी काय करतात, हेच अनाकलनीय आहे, अशी खंतही चौधरींनी व्यक्त केली.
पसार दोघे अटकेत; दोन दिवस कोठडी
कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणार्या पसार दोघांना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. सनी ज्ञानेश्वर जगधने (वय 24 रा. रंगभुवन, सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (वय 20 रा. घासगल्ली, कोठला) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची (दि. 13 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.