Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखहेरवाडने वाजवला सामाजिक क्रांतीचा बिगुल!

हेरवाडने वाजवला सामाजिक क्रांतीचा बिगुल!

ग्रामीण आणि शहरी अशी तुलना नेहमीच केली जाते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव आढळतो. विकासातही हा भाग नेहमीच पिछाडीवर असतो. ग्रामीण भागाबद्दल, तिथल्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक चालीरीतींबद्दल तथाकथित शहरी माणसांकडून नापसंती व्यक्त करणारे शब्दच बोलले जातात. गावंढळ म्हणून ग्रामस्थांना हिणवले जाते. अंधश्रद्धा आणि कुप्रथा ग्रामीण भागातच जास्त आढळतात असाही तथाकथित शहरवासियांचा समज असतो. त्यामुळेच गावकर्‍यांकडे काहीशा अवहेलनेच्या नजरेने पाहिले जाते. तथापि खेडेगावांमध्येही आर्थिक आणि काही प्रमाणात सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत. खेडीही कात टाकत आहेत. छोट्या छोट्या गावांमध्येही काही नवे विचार रुजत आहेत. बदलत्या काळाशी सुंसगत असे आधुनिक दृष्टीकोन रुजवणारे निर्णय खेडूत सुद्धा घेऊ लागले आहेत. महिलांशी संबंधित अनेक कुप्रथांना कायमची सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न माणसे करत आहेत. हेरवाड हे कोल्हापुरमधील शिरोळ तालुक्यातील एक गाव. गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय गावसभेने घेतला आहे. एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले की, जमलेल्या इतर बायका तिच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून टाकतात. तिच्या हातातील बांगड्या फोडतात. तिच्या कपाळावरचे कुंकू पुसतात आणि पायाच्या बोटातील जोडवी काढून टाकतात. त्याच क्षणापासून तिची गणना विधवा म्हणून केली जाते. या प्रथांना यापुढे गावात थाराच द्यायचा नाही असे हेरवाड गावसभेने ठरवले आहे. विधवा प्रथेसारख्या अनेक जुनाट कल्पनांना समाज आजही चिकटून आहे. पतीनिधन झाले म्हणून वाळीत टाकून आपण आपल्याच एका बहिणीवर अन्याय करत आहोत असे एकाही महिलेला का वाटू नये? आज एकीवर अशी वेळ आली, उद्या कोणाही भगिनीवर येऊ शकते याचीही जाणीव महिलांना का नसते? जन्मामागोमाग मृत्यू निश्चित आहे. तथापि तो केव्हा आणि कसा येणार याबद्दल कोणालाही कल्पना नसते. आजारपण, अपघात ही कारणे दिसतात तरी. तथापि हार्टअ‍ॅटॅक अथवा ब्रेन हॅमरेज सारख्या निमित्ताने कोणत्या क्षणी कोणत्या अवस्थेत आणि कुठे मृत्यू माणसाला गाठतो ते आजवर कोणालाच कळले नाही. कधी कळेल अशीही शक्यता नाही. विवाह करताना साथ देण्याचे वचन पती आणि पत्नी एकमेकांना देतात. ती देखील एक प्रथाच आहे. पण याचा अर्थ ते जन्मभर बरोबरच राहाणार असा होतो का? पती-पत्नीमधील एक साथीदार अचानक कायमचा निघून जातो. तो जर पती असेल तर त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळतो. ती मनाने कोलमडून पडते. स्वत:ला असहाय्य समजायला लागते. मनाने खचलेल्या महिलेला समाज विधवा प्रथा सहन करायला लावतो व तिला कायमचे मानसिक रुग्ण बनवतो तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल? हे फक्त ग्रामीण भागातच घडते असे नव्हे. करोनामुळे ज्यांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांचा मेळावा नाशिकमध्ये नुकताच पार पडला. त्या मेळाव्यातही काही महिलांनी त्यांच्या याच दु:खाला वाचा फोडली. विधवा म्हणून प्रसंगी अपमानास्पद वागणूक कशी दिली जाते याचा पाढा अनेकींना वाचला. विधवा महिलांच्या या दु:खाबद्दलची मन:पूर्वक दखल हेरवाड ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रवाहाविरोधात पोहोणे कधीही सोपे नसते. प्रवाहाविरुद्ध पोहोणे ताकद घेणारे असते. त्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ शकेल याची जाणीवही हेरवाड ग्रामस्थांना नक्की असणार. पण तरीही त्यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. सामाजिक पातळीवर त्यांनी हा आदेश गावाला दिला आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांसारखा सामाजिक क्र्ांती जोमाने घडवणारा राजा कधीकाळी लाभला होता. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षातच हेरवाडकरांना ही सुबुद्धी झाली ही देखील एकप्रकारे शाहू महाराजांच्या आधुनिक विचारसरणीला दिलेली श्रद्धांजलीच म्हणावी लागेल. सामाजिक परिवर्तनाचे हे वारे इतरत्रही पोहोचेल. इतर मंडळीही यातून बोध आणि प्रेरणा घेतील आणि जळमटासारख्या चिकटलेल्या अशा अनेक कुप्रथा संपुष्टात आणतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या