नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचा आत्मा हिंदू संस्कृती आहे. संघ सत्तेसाठी नाही तर समाजाच्या सेवेसाठी आणि संघटनेसाठी काम करतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. बंगळुरु या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या “संघाची 100 वर्षे: नवीन क्षितिज” या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेचा कुठलाही मोह नाही असेही मोहन भागवत म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे
भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू सभ्यतेशी जोडली गेली आहे आणि तिचे पूर्वज हिंदूच आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. याप्रसंगी रास्वसंघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि अनेक सामाजिक व्यक्ती उपस्थित होत्या. मोहन भागवत म्हणाले, “भारतातील प्रत्येकजण हिंदू आहे. येथील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन देखील एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. कदाचित ते विसरले असतील किंवा विसरले गेले असतील. भारतात कोणतेही गैर-हिंदू नाहीत.” भागवत म्हणाले, “संघ सत्ता किंवा प्रतिष्ठा शोधत नाही. संघाचे एकमेव उद्दिष्ट समाजाला एकत्र करणे आणि भारतमातेचे वैभव वाढवणे आहे. पूर्वी लोक यावर विश्वास ठेवत नव्हते, परंतु आता ते विश्वास ठेवतात.”
कधीकाळी लोकांना संघाच्या हेतूवर शंका होती
भागवत म्हणाले, “संघाला कधीही सत्तेची इच्छा नाही. हिंदू समाज संघटित करून भारतमातेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न संघ करतो. जेव्हा संघ म्हणून एकत्रितपणे जोर लावला जातो, तेव्हा त्याचा उद्देश काही राजकीय फायदा घेणे नसतो तर भारत मातेच्या सेवेसाठी समाजाला एकतेच्या सूत्रात बांधने असतो. कधीकाळी लोकांना संघाच्या हेतूवर शंका होती, मात्र आता तेही संघाचे कार्य आणि उद्दिष्ट समजू लागले आहेत.”
सनातन धर्म आणि भारत वेगळे केले जाऊ शकत नाही
मोहन भागवत पुढे म्हणाले, हिंदू समाजावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष्य केंद्रीत केले की आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही हे का करत आहात? प्रत्येक हिंदू हा भारतासाठी जबाबदार व्यक्ती आहे. आपल्याला आपली राष्ट्रीयता ही ब्रिटिशांनी दिलेली नाही. आपण प्राचीन काळापासून हिंदू आहोत. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना हे वास्तव ठाऊक आहे. प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते. भारताची मूळ संस्कृती काय? हा प्रश्न आपण विचारला तर त्याचे जे वर्णन आहे ते आपल्याला हिंदू या शब्दाकडे घेऊन जाते. या शिवाय, “भारत हिंदू राष्ट्र आहे आणि संविधानही याला विरोध करत नाही. सनातन धर्म आणि भारत यांना वेगळे केले जाऊ शकत नाही. सनातन धर्माची प्रगती म्हणजेच भारताची प्रगती,” असेही भागवत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




