Friday, July 12, 2024
Homeनाशिकअण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न'ने सन्मानित करा

अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

नाशिक । Nashik

- Advertisement -

लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती घेतल्यास त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्यांचे सर्व साहित्य तळगाळातील ‘नाही रे’ वर्गाला, महिला अन् दलित, आदिवासींना प्रेरणा देणारे आहे.

अशा या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एकमताने संमत केला आहे.

अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा, या मागणीसाठी पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहीम होती घेतली जाणार आहे,अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी दिली.

अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अतिशय महत्वाची भागिदारी केली आहे. शाहीर अमरशेख व शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. साहित्याच्या क्षेत्रात अण्णाभाऊंनी जवळपास 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 3 नाटके, 14 लोकनाट्ये, 10 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि कितीतरी शाहीरी कवने लिहून एक वेगळाच इतिहास घडविला आहे. त्यांच्या कादबंरी लेखनावर 7 मराठी चित्रपटही निघाले आहेत. समाजासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या 101 व्या जयंती वर्षात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने संमत केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्यावतीने केंद्राकडे याबाबत खंबीरपणे शिफारस करावी, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी राजू देसले , जिल्हा सहसचिव दत्तू तुपे, शहर नाशिक सचिव महादेव खुडे, रविकांत शार्दूल, सुभाष गवारे, नितीन शिराळकर, राहुल अडांगले, पद्माकर इंगळे, नितीन मते, विराज देवांग, तलाह शेख, अविनाश दोंदे, अपूर्व इंगळे आदी उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या