Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशदेशाला हादरवणारी हुंडाबळीची घटना! पतीने पत्नीला जाळून मारलं, मर्सिडीज कारसाठी छळाचा आरोप

देशाला हादरवणारी हुंडाबळीची घटना! पतीने पत्नीला जाळून मारलं, मर्सिडीज कारसाठी छळाचा आरोप

मुंबई । Mumbai

मागील काही दिवसांपासून हुंडाबळीच्या घटना देशभरात वाढत आहेत. महाराष्ट्रात नुकतीच पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्य हादरले होते. आता उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निक्की नावाच्या विवाहितेला तिच्या पतीने हुंड्यासाठी जिवंत जाळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, निक्कीचा पती विपिन सतत हुंड्याची मागणी करत होता. निक्कीच्या भावाने माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली होती. विपिनची त्यावर नजर होती. त्याने या कारसोबतच ६० लाख रुपये रोख देण्याची मागणी केली होती. हे न दिल्यानेच माझ्या बहिणीचा खून करण्यात आला,” असा धक्कादायक खुलासा निक्कीच्या भावाने केला.

YouTube video player

निक्कीच्या वडिलांनी सांगितले की, विवाहाच्या वेळीच विपिन व त्याच्या कुटुंबाकडून स्कॉर्पिओ कारची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी स्कॉर्पिओ दिली होती. नंतर बुलेट मोटरसायकलही देण्यात आली. तरीही हुंड्याच्या मागण्या सुरूच राहिल्या. या सर्वातून मुलीवर सतत छळ आणि मारहाण होत असल्याचे ते म्हणाले. निक्कीच्या वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. विपिनचे दुसऱ्या मुलीशी संबंध असल्याचे मुलगी अनेकदा सांगत होती. यामुळे घरगुती वाद वाढत गेले. विपिनची आई आणि वडीलही निक्कीला त्रास देत होते. अनेक वेळा पंचायत झाल्याचेही निक्कीच्या कुटुंबीयांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी विपिनने निक्कीला प्रथम बेदम मारहाण केली आणि नंतर तिला पेटवून दिले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान निक्कीचा मृत्यू झाला. या प्रकरणी विपिनसह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

निक्कीच्या वडिलांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जर आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही एसएसपी कार्यालयाबाहेर धरणे धरू,” असा इशारा त्यांनी दिला. ही घटना पुन्हा एकदा समाजासमोर हुंड्याच्या नावाखाली होणाऱ्या अमानुष अत्याचारांचे वास्तव मांडते. हुंडाबळीच्या घटना थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

राज

Raj Thackeray: “आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज…”; राज ठाकरेंकडून...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज १००वी जयंती आहे. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होत आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेसह राज्यभरात...