Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखदप्तराच्या ओझ्याचे घोडे अंशत: गंगेत न्हाणार?

दप्तराच्या ओझ्याचे घोडे अंशत: गंगेत न्हाणार?

विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचे घोडे अखेर अंशत: का होईना पण गंगेत न्हाले आहे. विद्यार्थ्यांच्या गेल्या दोन-तीन पिढ्या पाठीवर दप्तराचे ओझे वाहातच शिकल्या. शिक्षणाच्या आधुनिकीकरणाच्या सबबीखाली दप्तराचे ओझे वर्षानुवर्षे वाढतच गेले. ते कमी करण्यासंदर्भात यशपाल समितीने 1993 सालीच काही सूचना केल्या होत्या. त्यानंतर शासकीय पातळीवर दप्तराच्या ओझ्यासंदर्भात अनेकदा आदेश काढले गेले. पाठीवरच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना मणक्याचे आजार होऊ शकतात. त्यांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो याकडे वैद्यकीय तज्ञ लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतच होते. न्यायसंस्थेनेही दप्तराचे वजन कमी करण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले होते. वर्षानुवर्षे असे सगळे घडत असताना ओझे मात्र कमी होत नव्हते. किंबहुना त्या ओझ्यात वाढच होत होती. तथापि इयत्ता पहिली आणि काही प्रमाणात दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्याच्या आशा एका शासन निर्णयामुळे पल्लवित झाल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2022-2023) पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे एकात्मिक पुस्तक वापरात आणले जाणार आहे. इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये तर इयत्ता दुसरीसाठी राज्यातील 101 तालुक्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकात्मिक पुस्तक म्हणजे एका पुस्तकात सत्रनिहाय सर्व विषयांचा त्या वर्गाचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांना सत्राप्रमाणे एकच पुस्तक दप्तरात न्यावे लागेल. ही पुस्तके छापून तयार असल्याचे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळेच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता पालकांच्या मनात बळावली आहे. गेले दोन-तीन वर्षे शिक्षणक्षेत्र सतत गाजत राहिले. कधी त्याला ‘प्रयोगशील’ म्हटले गेले तर कधी ‘उपक्रमशील’! अभ्यासक्रम, शाळांच्या वेळा, विद्यार्थ्यांची संख्या अशा अनेक मुद्यांवर विविध निर्णय घेतले गेले आणि त्यांचा खुर्दाही झाला. त्या काळात शिक्षण क्षेत्रात शासकीय पातळीवर काय सुरु होते याचा पत्ता शालेय शिक्षकांना आणि अधिकार्‍यांना तरी होता की नाही हे कोणीच ठामपणे आत्ताही सांगू शकणार नाही. विद्यार्थ्यांची आणि पालकांची गोष्ट तर फार लांबची. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या काळजीने आणि धोरणातील धरसोडवृत्तीने फक्त हैराण होण्यापलीकडे पालकांच्या हाती फारसे काही नव्हते. विद्यार्थ्यांच्या नुकत्याच शालेय परीक्षा पार पडल्या. काहींच्या पार पडत आहेत. त्यात मुले उत्तीर्ण होतील की नाही याविषयी त्यांचे पालकच साशंक आहेत. कारण गेले दोन वर्षे शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेले दोन-तीन महिने शाळा अधुनमधून सुरु होत्या. विद्यार्थी शाळेत येत होते. वर्गही भरत होते. त्यांच्या परीक्षाही पार पडल्या. तथापि आपण पुढच्या इयत्तेत गेलो म्हणजे नेमके काय शिकलो? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा सतावत आहे. या पार्श्वभूमीवर निदान पहिली आणि दुसरीच्या वर्गात जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासादायक निर्णय सरकारने जाहीर केला आहे. जेमतेम सहा-सात वर्षांच्या चिमुकल्यांच्या पाठीवरचे ओझे सर्वांनाच परेशान करत होते. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ अशीच त्यांची अवस्था होती. पण पालकांचीही द्विधा मनस्थिती झाली असावी. त्यांच्यासाठी सध्याचे दिवस स्पर्धेचे आणि विविध स्पर्धा परीक्षांचे आहेत. आपल्या मुलाने प्राविण्य मिळवावे अशीच बहुतेक पालकांची इच्छा असते. पण पालकांचे असे वाटणे मुलांवर अन्याय करणारे आहे असे किती पालकांना वाटत असेल? त्यामुळेच दप्तराच्या वाढत्या ओझ्याकडे पालकांना दुर्लक्ष करावे लागत असेल का? आगामी जुन महिन्यापासून पहिली आणि दुसरीच्या इयत्तेपुरती एकात्मिक पुस्तके वापरात आणली जातील आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे थोडेसे हलके होईल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या