ठाणगाव | वार्ताहर Thangaon
येथे जोरदार पावसामुळे गावातील मध्यवर्ती भागातील एक जुने घर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घरमालकाने शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर सुरू असल्याने नदी, नाले तुडुंब झाले आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले असून पिकांचे देखील नुकसान होत आहे. गावात अनेक जुनी दगडी, मातीचे घरे असून आजही या घरांमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, पावसामुळे अशा घराच्या भिंतींना तडे जाण्याचे प्रकार घडत असतात. गावाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिर चौकात बाळासाहेब रंगनाथ बोर्हाडे यांचे दोन मजली जुने घर आहे. हे घर दगड व मातीचे आहे. घराचा बराच भाग लाकडाचा असून छतावर कौले आहेत. जुने घर असल्याने सततच्या पावसामुळे काही दिवसांपासून घराच्या भिंतीला तडे गेले होते. त्यात मंगळवारपासून परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. त्यात बुधवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान अचानक घराची भिंत कोसळली. बोर्हाडे कुटुंब मळ्यात वास्तव्यास आहेत.
मात्र, या जुन्या घरात त्यांच्या वृद्ध आत्या राहतात. सुदैवाने या घटनेतून त्या सुखरूप बचावल्या. या घराशेजारील रस्त्यावरुन दिवसभर लोकांची वर्दळ असते. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. दिवसा ही भिंत कोसळली असती मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी राहुल काळभोर आणि ग्रामसेवक कातोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच नामदेव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जीर्ण घरांची तपासणी व्हावी
गावात या घटनेनंतर जुनी व जीर्ण घरे असलेल्या कुटुंबांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने तपासणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात राहणार्या आमच्या आत्यांना काही झाले नाही. मात्र, यातून सावरणे कुटुंबाला अवघड असल्याने शासनाने त्वरित मदत जाहीर करून आम्हाला आधार द्यावा.
बाळासाहेब बोर्हाडे,घरमालक





