Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेख.. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे!

.. मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे!

कधीतरी एखादा दिवसच विचित्र उगवतो. काहींच्या जीवाला उगाचच हुरहूर लावतो तर ‘जीवाला बरे वाटत नाही’ अशी भावना काहींच्या मनात उगाचच दाटून येते. एक अज्ञात कवी म्हणतो, ‘ एखादा दिवस असा रेंगाळतो, एकेक क्षण युगासारखा..नुसते नगारे वाजवणा-या कोरड्या पोकळ ढगासारखा..’ काल-परवाचे दोन दिवस तसेच उजाडले आणि दोन विलक्षण प्रतिभावान माणसे कुशीत घेऊन मावळले. प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराज आणि ज्येष्ठ राजकीय नेते व परिवर्तन चळवळीचे खंदे आधारस्तंभ प्रा. एन.डी.पाटील ही दोन प्रतिभावान व्यक्तिमत्वे कायमची अनंताच्या प्रवासाला निघून गेली. एकाने भारताची कलासंपन्नता जगात पोहोचवली. तर दुसऱ्याने महाराष्ट्रातील दुर्बलांना अस्मिता शिकवली. त्यांच्या दुबळ्या पंखात जाणिवांचा हुंकार भरला. एका लेखकाने त्यांच्या एका लेखात पाटील सरांचे वर्णन ‘बिकट वाटेचे प्रवासी’ असे केले होते. बिरजू महाराजांच्या सुरुवातीच्या वाटचालीलाही तेच विशेषण तंतोतंत लागू पडते. महाराजांचा जन्म संपन्न कुटुंबात झाला होता. पण बघता बघता सगळे ऐश्वर्य लयाला गेले. त्यांचे कुटुंब कर्जबाजारी झाले. इतके की, लहानपणी उडवण्यासाठी एक पतंग मिळावा म्हणून तो विकणाऱ्याला त्यांना नृत्य करवून दाखवावे लागायचे. त्यावेळीच त्यांनी त्यांच्या मातोश्रीना वचन दिले होते, काहीही झाले तरी नृत्याचा सराव थांबवणार नाही’. जे वचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत निभावले. हे सगळे एकदा बिरजू महाराज यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. ब्रिजमोहन ते बिरजू महाराज होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर आणि अखंड तपश्चर्येचा होता. ते कथ्थक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे नर्तक होते. त्यांचे वडील अच्छन महाराज यांनीच त्यांना नृत्याची दीक्षा दिली होती. भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कथ्थक केंद्र या ठिकाणी देखील ते शिकवत. त्यांनी ‘कलाश्रम’ ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली होती. त्यांनी असंख्य शिष्य घडवले. कथक कलेचा जगभर प्रसार केला. अनेक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले होते. ते नृत्य दिग्दर्शन करत त्या चित्रपटातील अभिनेत्री पूर्ण पोशाख परिधान करेल आणि डोळ्यांनी बोलेल व अभिनय करेल अशी त्यांची अट असे, असे त्यांनीच माध्यमांना एकदा सांगितले होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बिरजू महाराजांच्या जाण्याने घुंगरातील लय थांबली आहे आणि त्यातील सूर मौन झाले आहेत. तर पाटील सरांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळ आणि मराठी माणूस पोरका झाला आहे. त्यांचीही कारकीर्द विलक्षण संघर्षाने भरलेली आणि भारलेली होती. त्यांच्या एका व्यक्तिमत्वात अनेक रूपे सहज सामावलेली होती. लोकप्रतिनिधी, नामदार, ज्येष्ठ नेते, सामान्य माणसांचे, परिवर्तनवादी चळवळीचे खंदे पाठीराखे आणि कौटुंबिक पातळीवर पती, पिता, आजोबा हीच ती रूपे. त्यांच्या पत्नी सरोजताई यांनी त्यांचे वर्णन ‘वादळ’ असे केले होते. त्याची प्रचिती सामान्य माणसांना नेहमीच येत होती. त्यांनी महाराष्ट्रभर अखंड प्रवास केला. शेतकरी कामगार पक्ष, रयत शिक्षण संस्था, गिरणी कामगार संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, धरणग्रस्त आणि विस्थापित, सेझ विरोधी लढा अशी त्यांच्या कार्यक्षेत्राची नुसती यादी देखील मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाणारी आहे. एका दमात वाचणे सुद्धा शक्य नाही अशी. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्ष पूर्णवेळ काम केले. वकिलीचे शिक्षण घेतले पण रूढार्थाने वकिली केली नाही. ते ज्ञान सामान्य माणसांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच उपयोगात आणले. म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांच्या जाण्याने सामान्य माणसांसाठी निरलस वृत्तीने संघर्ष करणारा शेवटचा लढाऊ माणूस हरपला असे म्हंटले आहे. पाटील सरही अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. महाराष्ट्राने बेळगावचा सीमालढा जिंकावा, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला खंडपीठ व्हावे आणि शेतकऱ्यांना सदैव न्याय मिळवून देणे या त्यांच्या तीन इच्छा ते नेहमी व्यक्त करत असे त्यांचे एक सहकारी टी.एस. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बिरजू महाराज आणि एन.डी. पाटील दोघांचेही समाज आणि शिष्यांच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान होते. एकाने कलेचा वारसा जपला तर दुसऱ्याने अविरत संघर्षाचा. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. ‘देशदूत’ परिवाराची दोघांनाही आदरांजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या