Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखअजून किती काळ पुराची तलवार टांगती राहाणार?

अजून किती काळ पुराची तलवार टांगती राहाणार?

राज्यभर पावसाची संततधार सुरुच आहे. राज्याच्या विविध भागात आगामी चोवीत तास मुसळधार पावसाचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ (‘Orange Alert’) जारी केला आहे. नद्या-नाले तुडूंब भरुन वाहात आहेत. काही नद्या दुथडी भरुन वाहात असून अनेक शहरांना पुराचा तडाखा बसला आहे.

नाशिक शहर त्यापैकीच एक! जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहात आहेत. गोदावरीला देखल पूर आला आहे. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहराच्या विविध भागात पाणी भरले आहे. पाऊस आणि नाशिकचा पूर हे समीकरणच बनले आहे. गेली काही वर्षे नाशिककरांना अपवाद वगळता दरवर्षीच पुराचा तडाखा बसतो. हजारो लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून जातात. गोदातीरीच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. पुराचे पाणी वाढण्याच्या धास्तीने गोदाकाठी राहाणार्या लोकांची झोप पळून जाते.

- Advertisement -

गोदाकाठचे लोक पुराच्या भीतीने आणि शहरातील लोक ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे त्रस्त, हे दरवर्षीचेच वास्तव बनले आहे. गोदेच्या पुराचा इतिहास फार जुना आहे. तथापि अलीकडच्या काळात 1969 साली आलेला तोपर्यंतचा सर्वात मोठा पूर होता असे मानले जाते. त्यानंतर आजपर्यंत असे अनेक छोटेमोठे पूर आले. पण नाशिककरांच्या लक्षात राहिला तो 2008 साली गोदेला अचानक आलेला महापूर. तो नाशिककरांच्या उरात धडकी भरवणारा आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी करणारा ठरला. पाण्याची पातळी इतकी अचानक वाढली की गोदेकाठच्या लोकांना आवरायला आणि सावरायला अवधीच मिळाला नाही. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी करणारा महापूर असा अचानक कसा आला? त्याची अनेक कारणे सांगितली गेली. दरवर्षी कमी दिवसात जास्तीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढतच आहे. सामान्यत: त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांना पावसाचे माहेरघर मानले जाते. याच दोन तालुक्यांना धरणांचे गावही म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पडणार्या पावसाचे प्रमाणही वेगवेगळे आहे. यंदा दिंडोरी तालुक्यात ढगफुटी झाली. निसर्गाचीही प्रकृती बदलली आहे.

पावसाळा जुनऐवजी जुलैमध्ये सुरु होतो. कमी दिवसात धबाबा पाऊस पडतो. शिवाय गंगापूर धरणात गाळ साठला आहे. त्यामुळे धरणाची क्षमता कमी झाली आहे. कदाचित इतरही काही धरणांची तीच स्थिती असेल. हा झाला निसर्गाचा भाग. पण अलीकडच्या काळात नाशिकला ‘मानवी चुकी’मुळे सातत्याने पुराचा तडाखा बसतो आहे असे मत तज्ञ मांडतात. 2008 साली असेच झाले होते. पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पूर्वतयारी नसल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्या चुकीपासून प्रशासनालाही मोठा धडा घेता आला. ते शहाणपण नंतर आलेल्या छोट्या मोठ्या पुरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरले. तथापि 2016 सालचा पुरही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. त्यावेळीही पाऊस जोरदारच होता. नदीपात्रात साधारणत: 75 हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. साधारणत: 50 हजार क्युसेस पाणी धरणातून सोडण्यात आले होते. त्यात भर पडली शहरात पडलेल्या पावसाच्या पाण्याची. ते पाणी होते साधारणत: 25 हजार क्युसेस. नाशिक नऊ टेकड्यांवर वसलेले आहे. त्यामुळे शहरातील पाणी नदीला जाऊन मिळणारच. पण तरीही अलीकडच्या काळात गोदेला सातत्याने पूर का येत आहेत? पुराचे पाणी उलटे शहरात कसे शिरते? फसलेली पावसाळी गटार योजना हे त्याचे प्रमुख कारण जाणकार नागरिक बोलून दाखवतात.

315 कोटी रुपये खर्चाची ही योजना सुरुवातीपासुनच वादग्रस्त ठरली होती. गावातील पावसाचे पाणी पाईपलाईनमधून गावाच्या बाहेर नदीपात्रात सोडणे हा या योजनेचा मुळ उद्देश होता. पण घडले काय? शहरातच अनेक ठिकाणी पाईपांचे काम अर्धवटच सोडून देण्यात आल्याचे आढळले. जुन्या नाशिकसारख्या भागात पावसाळी पाण्याची योजना आणि सांडपाणी वाहून नेणारी योजना एकत्रित झाली. त्यामुळे सांडपाण्याच्या पाईपांमध्ये पावसाचे पाणी जाऊ लागले. त्याचा ताण पंपिंग स्टेशनवर येतो. गटारीचे पाणी नदीपात्रात मिसळते. तात्पर्य, अशा तांत्रिक चुकांची किंमत नाशिककरांना मोजावी लागते. गोदातीरी लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरते तर नाशिकच्या चौकाचौकात गटारींचे पाणी रस्त्यांवर वाहाते. त्यामुळे शहरही पाण्यात जाते. याला नाशिक महानगरपालिका आणि सद्यस्थितीत स्मार्ट सिटी योजनाही तितकीच जबाबदार आहे. गावठाणांचा विकास करुन लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी स्मार्ट सिटी योजना राबवली जात असल्याचे सांगितले गेले. पण तसे घडले का? स्मार्ट सिटीच्या कामाविषयी सुजाण नाशिककर वेळोवेळी तक्रारी करत आहेत. गोदापात्रातील क्राँक्रिट पूर्ण न काढणे, तीरावर दीपस्तंभ लावणे, काठावर फरशा बसवून काठ उंच करणे या कामांकडे वेळोवेळी संबंधितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण लक्षात कोण घेतो? तक्रारी लक्षात घेण्यासाठी काही वेगळी आयुधे लागतात.

हे सामान्य नागरिकांना माहित नसते. मग त्यांच्या तक्रारी ऐकणार कोण. तांत्रिक चुकांवर काहीच उपाय योजले जाऊ शकत नाहीत का? गंगापूर धरणाची क्षमता वाढवणे हा एक उपाय सांगितला जातो. पण दुसर्या बाजूला हे काम प्रचंड खर्चिक होईल असेही बोलले जाते. गोदापात्रावर छोटे छोटे बंधारे बांधता येऊ शकतील असेही काही जाणकार सुचवतात. राज्यातील तज्ञांकडूनही उपाययोजना मागवता येऊ शकतील. मात्र संबंधितांना शहराबद्दल तितका कळवळा असेल तरच! यासाठी प्रशासन पुढाकार घेईल का? की नाशिककरांना वर्षानुवर्षे पुराचा सामना करतच राहावे लागेल?

- Advertisment -

ताज्या बातम्या