Tuesday, May 7, 2024
Homeब्लॉगबाळा होऊ कशी उतराई?

बाळा होऊ कशी उतराई?

घराघरातील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? व्यक्तीनुसार संवादाचे मुद्दे भलेही बदलत जातात पण संवाद मात्र कायमच राहायला हवा. एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे नवे सदर

बाळाचा जन्म हा स्रीच्या आयुष्यातील मोठा क्षण आहे. स्वतःला झालेल्या प्रसूती वेदना ती बाळाला पाहून विसरून जाते. प्रसूती म्हणजे खरे तर स्त्रीचा पुनर्जन्म असेही म्हणता येते. सर्वच जण विवंचनेत असतांना बाळाचे आगमन सुखाचे चांदणे पसरविते अगदी दोन्ही कुटुंबांवर. आई बाळाला प्रथम स्तनपान देते. ही मातृत्वाची मोठी गोड अशी गोष्ट आहे. बाळाला अंगावर दूध पाजतांना आई बाळाच्या डोक्यावर हळूवारपणे हात फिरवते. हा मायेचा हात म्हणजे आईने बाळाच्या डोक्यावर हात ठेऊन दिलेला पहिला आशीर्वाद असतो. ह्या आशीर्वादाने बाळ मोठे होऊ लागते ते घरातील सर्वांच्याच प्रेमाने व आपुलकीने. बाळाच्या जन्माने मुलीच्या आयुष्याला पूर्णत्व मिळते. कारण त्याच्यामुळे ती आई होते. जीवनातील या घटनेने तिच्या आयुष्याला एक हवीहवीशी कलाटणी मिळते. तिच्या जीवनाला पूर्णत्वाचा अर्थ मिळतो.

‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई..’हे गाणेही ती सहजपणे गुणगुणू लागते. त्याला आपल्या कुशीत गोंजारतांना, हेच बाळ दोन्ही कुटुंबांना रेशमाच्या धाग्याने जणू हळूवारपणे गुंफवून टाकते. दोन्ही घरांच्या माधुर्याचा दुवा बनते. ह्या तान्हुल्याला कुठे ठेवू नि कुठे नको असे घरातील प्रत्येकालाच वाटू लागते. दोन्ही घरच्या आजी-आजोबांसाठी हे बाळ म्हणजे मायेचा सागर असतो नि दुधावरची सायही. ही आनंदमय घटना आपण सर्वच जण अनुभवतो व बाळासाठी कामालाही लागतो. बाळाची कामे तर खूप. दुपटे वाळत घालण्यापासून अगदी दिवसभर चालू राहणारी. तो इवला जीव रडला तरी सगळेच बेचैन होतात. बाळ का रडत असेल, यामागे प्रत्येकजण कारणेही शोधू लागतो. जवळपासचे बालगोपालही त्याच्याशी खेळू पाहतात. हे बाळ सबंध घर जागवते.

- Advertisement -

एकदा त्याला हलकासा मसाज करून झोळीत झोपवले की घर एकदम शांतच होऊन जाते. एवढी किमया ह्या गुणी बाळात असते. कलेकलेने चंद्र वाढतो तसे हे बाळही हळूहळू आपल्या नकळत मोठे होऊ लागते. त्याचे पालथे पडणे, रांगणे हे सुद्धा आपण मोठ्या कौतुकाने पाहतो. परमेश्वर आपल्याला दिसत नाही पण तो असतो की हो! परमेश्वरास प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून तो त्याचे काम आईवर सोपवतो आणि ती पण जीवापलिकडे तान्हूल्याला आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवत असते. बाळ जेव्हा उभे राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रथम आई त्याला आपले बोट धरून हळूच चालायला शिकवते. बाबा त्याचे मन रमवतात. ह्या तान्हुल्यावर सर्वांनीच संस्कार करायचे आहेत, त्याला हळूहळू मोठे करायचे आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. पहा काय होते की बाळाबरोबर घरातील सर्वचजण खेळत राहतात, बाळाबरोबर असले की आपले प्रश्न विसरतात व रमतात की त्याच्या बरोबर चांगले तासन् तास. बाळाच्या लीला मोठ्या गोड असतात. ते हसले की आपल्याला जणू सार्थक झाल्यासारखे वाटते नि आपणही नकळत खुलून येतो. बाळाशी संवाद साधण्याची ज्याची त्याची भाषा वेगवेगळी असते. ती मोठीच मजेशीर असते. वाचक मित्रहो, रमता ना तुम्ही अशा चिमुकल्यांमध्ये !!

क्रमशः

- Advertisment -

ताज्या बातम्या