पुणे | प्रतिनिधी Pune
थायलंडमधून पुण्यात आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी ३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा १० किलो ६४२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, हा गांजा नूडल्स आणि ‘फ्रीझ ड्राइड मंथॉन्ग ड्युरियन’ या सुक्या फळांच्या पाकिटांमध्ये लपवून आणण्यात आला होता. अमली पदार्थ तस्करीची ही वेगळी पद्धत कस्टम्सच्या कारवाईत उघडकीस आली आहे.
पुणे कस्टम्सच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) आणि विमानतळावरील पथकाने ही कारवाई केली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानाने बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या हालचाली आणि सामानाच्या तपासणीदरम्यान संशय आल्याने त्याला अडविण्यात आले. प्रवाशाच्या चेक-इन ट्रॉली बॅगची सखोल तपासणी केली असता तस्करीची ही पद्धत समोर आली.
प्रवाशाने गांजा लपविण्यासाठी खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा वापर केला होता. बॅगेतील नूडल्सच्या पाकिटांमध्ये नऊ आयताकृती चंदेरी रंगाच्या पाकिटांत अमली पदार्थ लपविण्यात आला होता. या पाकिटांवर ‘फ्रीझ ड्राइड मंथॉन्ग ड्युरियन’ असे लेबल लावण्यात आले होते. प्रत्येक पाकिटाला काळ्या रंगाच्या पॉलिथिनचे दोन थर आणि व्हॅक्यूम सीलिंग करण्यात आले होते. त्यामुळे तपासणी यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी ही पाकिटे उघडून तपासली असता त्यामध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचे वाळलेले फुलांचे भाग आढळले. त्यातून तीव्र उग्र वास येत होता. अमली पदार्थ तपासणी किटद्वारे चाचणी केली असता त्यामध्ये गांजा (हायड्रोपोनिक वीड) असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.
कस्टम्सने हा १०.६४२ किलो गांजा आणि त्याच्या पॅकिंगसाठी वापरलेले साहित्य अमली पदार्थ व मनोविकारी पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) जप्त केले. संबंधित प्रवाशाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तस्करीमागील टोळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पुणे कस्टम्सने दिली.




