Monday, May 6, 2024
Homeअग्रलेख'मला काय त्याचे’ हे बघेपण सोडणे जरुर!

‘मला काय त्याचे’ हे बघेपण सोडणे जरुर!

काळ्याकुट्ट काळोखात..जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी..दीवा घेऊन उभं असतं..
असे मंगेश पाडगावकर म्हणतात. परस्पर सहकार्याचा तोच अनुभव पाचोरा तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींना आणि त्यांच्या पालकांना आला आहे. त्या घटनेचेे वृत्त माध्यमात झळकले आहे. ही घटना नाशिक नजिकच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे घडली. कुठल्यातरी धार्मिक भंडार्‍याच्या सबबीने गावात काही माणसे धान्य गोळा करत होती. त्याचवेळी शाळा सुटल्याने शाळेतील मुले-मुली घरी परतत होते. धान्य गोळा करणार्‍या दोन माणसांनी या विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळवला. चौथीत शिकणार्‍या तीन विद्यार्थिनींना त्यांनी जवळ बोलावले. त्या मुलींना खाऊ म्हणून बिस्किटे दिली. गाडीवर घरी सोडण्याचे सौजन्य दाखवून त्या लहानग्यांना दुचाकीवर बसवले. तेवढ्यात जवळच काम करणार्‍या दोन महिलांना त्या माणसांचा संशय आला. त्यांनी धाडस करुन त्या माणसांची दुचाकी अडवली आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेल्या त्या दोन पोरी पळवणार्‍यांनी मुलींना गाडीवरुन खाली ढकलून दिले आणि पळ काढला. यासंदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या महिलांचे लक्ष गेले नसते तर किंवा लक्षात येऊनही त्या गप्प बसल्या असत्या तर? गाडी अडवायचे धाडस त्यांनी दाखवले नसते तर? त्या मुलींवर कोणता दुदैर्वी प्रसंग ओढवला असता या शक्यतेच्या नुसत्या विचारांनी कोणाच्याही अंगावर काटा येईल. त्या घटनेनंतर छोट्या मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. वास्तविक परस्पर सहकार्याची किंवा मदतीची भावना, संवेदनशिलता, सामाजिक बांधिलकी, विश्वास ही माणसाची अंगभूत गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच कवी नीरज म्हणतात,
बस यही अपराध मैं हर बार करता हूँ
आदमी हूँ आदमीचे प्यार करता हूँ..
पण माणसांनी एकमेकांच्या मदतीला धाव घेण्याचे प्रसंग अलीकडे क्वचितच घडतात वा ऐकावयास मिळतात. बहुतेक वेळा अशा अनुचित घटना घडताना आसपास असलेली माणसे सुद्धा बघ्याची भूमिका घेताना आढळतात. ‘आपल्याला काय त्याचे’ या आविर्भावात तिकडे बघत आपापल्या नादातच चालू पडतात. रस्त्यावर एखादा अपघात झाल्यावर इतरेजनांनी आपसुकच मदतीला धावणे माणूसपणाचे लक्षण आहे. पण अलीकडे माणसे अशी धावतात ते फक्त आपापल्या मोबाईलमध्ये त्या घटनेचे फोटो किंवा चित्रफित घेण्यासाठी. अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. रेल्वेच्या गर्दीने भरलेल्या डब्यात महिलांना छेडखानीला सामोरे जावे लागते. अशाच एखाद्या डब्यात बलात्काराचा दुर्दैवी प्रसंगही एखादीवर ओढवतो. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तथापि मानवी मूल्यांचा जिथे विसर पडतो तिथे कायद्याची भाषा कोणाला समजणार? तथापि परिस्थिती जाणत्यांना वाटते तेवढी निराशाजनक नाही हे राणीचे बांबरुड या गावातील दोन महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यातले माणूसपण जागे होते. त्यामुळे त्या गप्प बसू शकल्या नाहीत. दोघीच काय करु शकू? गुंडांनी मारले तर? त्यांनी डुख धरला तर? असे कोणतेही प्रश्न त्यांना पडले नाहीत. अशा घटना भलेही विरळाच अनुभवास येत असतील. पण अंधाराची तीव्रता कमी करण्यासाठी प्रकाशाची एखादी तिरीप वा कवडसाही पुरे होतो. समाजाने बघ्याची भूमिका सोडली तर अनेक गुन्हे घडण्याआधीच थांबवता येऊ शकतील. मुली निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकतील. समाजही निर्ढावणार नाही. माणूसपणाची भावना मूळ धरेल. बांबरुड घटनेवरुन समाज प्रेेरणा घेईल आणि मानवी मुूल्यांचा पुरस्कार करत राहिल अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या