मुंबई । Mumbai
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण बनलं आहे. कारण, पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे.
त्यामध्ये, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्यामुळे, पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारही विभागले गेले आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज घेता महाविकास आघाडीचे पारडे जड दिसते. मात्र, लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड वाटतं. त्यामुळे, या निवडणुकांचा राजकीय अंदाज येत नाही.
त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी आयएएनस (IANS) आणि मॅट्रिझ (MATRIZE ) यांनी ओपिनियन पोलच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं पारडं आता विधानसभेपूर्वी महायुतीच्या दिशेने कलताना दिसत आहे. कारण आयएएनस आणि मॅट्रिझ यांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे.
महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 5-9 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर, काँग्रेसला 4-8 च्या दरम्यान जागा मिळू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 4 जागा मिळू शकतात तर समाजवादी पार्टीला 4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत 41 टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना 10-13 दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज IANS- MATRIZE च्या सर्व्हेमधून समोर आला आहे.