Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाICC World Cup : अंतिम टप्पा...फिरकी गोलंदाजांचा

ICC World Cup : अंतिम टप्पा…फिरकी गोलंदाजांचा

वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम टप्पा आता जवळपास सुरू झाला आहे. बहुतांश संघांचे प्रत्येकी सहा सामने झाले आहेत. प्रत्येकाला आता अजून तीन साखळी सामने खेळायचे आहेत व नंतर दहापैकी चार संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात व अंतिम सामन्यात त्यातून दोन संघ पोहोचणार आहेत. या स्पर्धेवर आतापर्यंत फलंदाज तसेच मध्यमगती व फिरकी गोलंदाजांची संमिश्र कामगिरी झाली असली तरी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात फिरकी गोलंदाजांची चलती राहील…असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीयच नव्हे तर आशिया उपखंडातील क्रिकेट खेळपट्ट्या जेवढ्या बॅटींगला उपयुक्त असतात, तेवढ्याच त्या स्पीन बोलिंगलाही फायदेशीर मानल्या जातात. येथे मध्यमगती वा तेजतर्रार गोलंदाजांनाही खेळपट्टीची साथ मिळते, पण ती फिरकीच्या तुलनेत कमी असते. अशा पार्श्वभूमीवर, भारतात सध्या सुरू असलेला वर्ल्डकप आतापर्यंत फलंदाजांना काही प्रमाणात तर मध्यमगती व फिरकी गोलंदाजीला सम प्रमाणात साथ देऊन गेला आहे. फलंदाजीत बहुतांश संघांनी पावणे तीनशे धावांपर्यंतच मजल मारली आहे. फक्त दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडने तीनशे धावांच्या पुढे थेट चारशे धावांपर्यंत धडक मारली. अर्थात त्यापैकी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचा आणि न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका सामना वगळता अन्य दक्षिण आफ्रिका व इंग्लंडच्या सामन्यांत प्रतिस्पर्धी गोलंदाजी अगदीच सुमार होती. त्यामुळे त्यांना धावांचा डोंगर उभारता आला. पण आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात खेळपट्ट्या निर्णायक भूमिका बजावणार आहेत व त्या फिरकीपटूंना साथ देण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisement -

मुरलीधरनही सहमत

वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये फिरकी गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरणार असल्याबाबत श्रीलंकेचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यानेही सहमती दर्शवली. स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. बाद फेरीचे सामने होतील तेव्हा फिरकी गोलंदाजांचे महत्त्व वाढलेले असेल. फिरकी गोलंदाजांची कामगिरी या टप्प्यात निर्णायक ठरेल, असे मत त्याने व्यक्त केले.
स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या केंद्रांवरील खेळपट्टी चांगल्या असून, त्यांचा दर्जा राखण्यात आल्याचे गौरवोदगार व्यक्त करून, चेन्नई आणि नवी दिल्लीच्या मैदानावरील खेळपट्ट्या संथ होत्या, पण इतके सामने खेळल्यावर तेवढा परिणाम होणारच आहे. त्यामुळेच स्पर्धेच्या उत्तरार्धात फिरकी गोलंदाजांची कामगिरी सामन्यांचे निकाल बदलू शकणारी असेल, असाही दावा त्याने केला. यंदाच्या स्पर्धेत अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघांच्या कामगिरीची चर्चा होत असली तरी अफगाणिस्तानपेक्षा नेदरलँड्सच्या कामगिरीचे कौतुक आणि आश्चर्य अधिक आहे. कारण, अफगाणिस्तानला कसोटी दर्जा मिळाला आहे. नेदरलँड्सला अजून तो दर्जा नाही. तसेच, मायदेशात ते वेगळ्या वातावरणात आणि वेगवान खेळपट्ट्यांवर खेळतात त्यामुळे एकदम उपखंडातील संथ खेळपट्ट्यावर येऊन खेळताना त्यांनी दाखवलेला दर्जा नक्की आश्चर्य वाटणारा आहे, असेही मुरलीधरनने आवर्जून सांगितले.

भारताला अधिक संधी

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी होत आहे. घरच्या मैदानावर खेळताना संघ चांगला स्थिरावला आहे. सर्वच आघाड्यांवर त्यांची कामगिरी चांगली होत असल्यामुळे भारताला विजेतेपदाची अधिक संधी असेल, असे मत मुरलीधरनने व्यक्त केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करण्याची आकडेवारी पाहिली तर, विराट कोहली पाठलाग करताना सर्वोत्तम फलंदाज ठरतो तसेच या स्पर्धेत अफगाणिस्तानची फिरकी सर्वोत्तम आहे. रशीद, मुजीब, मोहम्मद आणि नूर या चारही गोलंदाजांनी प्रभावित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या प्रवासात भारतीय संघ, विराट कोहली आणि अफगाणिस्तानच्या फिरकीने जिंकून घेतले, असेही मुरलीधरनने आवर्जून सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या