Monday, October 14, 2024
Homeक्रीडाICC World Cup : केशव महाराज...हनुमान भक्त

ICC World Cup : केशव महाराज…हनुमान भक्त

त्याच्या हृदयात हनुमान आहे व बॅटवर ओम…दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज सध्या भारतीय क्रिकेट शौकिनांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. भारतीय वंशाचा हा खेळाडू थरारक सामन्यात पाकिस्तानवर भारी पडल्याने त्याच्याविषयी कौतुकास्पद भावना क्रिकेट शौकिनांच्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने पाकिस्तानला नमवले व संघाच्या या विजयात केशव महाराज याचे योगदान चर्चेत आले. या स्पर्धेतील अनेक सामने एकतर्फी झाले असले तरी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान हा सामना त्याला अपवाद होता. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली.

हा सामना दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू आहे की, दक्षिण आफ्रिकेला जिंकून देणारा केशव महाराज आहे कोण याची. केशव महाराज मूळचा भारतीय आहे. हिंदू धर्माबद्दल त्याला विशेष जिव्हाळा आहे. दक्षिण आफ्रिकेकडून तो बर्‍याच वर्षांपासून क्रिकेट खेळतो. पाकिस्तानविरुद्ध संघ संकटात असताना महाराजने जबाबदारीने खेळ केला. तळाच्या दोन फलंदाजांना घेऊन विजयासाठीच्या 11 धावा जोडताना शेवटी त्याने विजयी चौकार लगावताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. यातील काही गोष्टी शौकिनांना आश्चर्यचकित करून गेल्या. ज्याच्या बॅटवर ओम लिहिलेय आणि जो हनुमानाचा भक्त आहे, तो पाकिस्तानकडून कसा काय पराभूत होऊ शकतो, असे या अनेक मेसेजचे सार होते. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात केशव महाराजे फार धावा केल्या नाही वा त्याला एक विकेटही मिळाली नाही. पण सोशल मीडियावर त्याचीच हवा आहे. पाकिस्तानविरुद्ध आफ्रिकेचा संघ अडचणीत असताना महाराजने थंड डोक्याने खेळ केला आणि विजयी चौकार लगावत विजय मिळवून दिल्याचे कौतुक सोशल मिडियावर आहे.

- Advertisement -

केशव महाराजाचे पूर्ण नाव केशव आत्मानंद महाराज. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहरातला. वडील आत्मानंद, तर आईचे नाव कांचन माला. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरचे रहिवासी. 1874 मध्ये ते डर्बनला स्थायिक झाले. केशवचे आजोबा-पणजोबा भारताबाहेर वाढले. पण त्यांनी भारतीय प्रथा-परंपरा नेहमी जपल्या. त्यामुळेच केशवला लहानपणापासूनच हिंदू धर्माबद्दल कुतूहल आणि आस्था आहे. तो हनुमानाचा भक्त आहे. वेळात वेळ काढून तो मंदिरात जातो. प्रार्थना करतो. काही दिवसांपूर्वीच तो केरळमधील एका मंदिरातही गेला होता. फलंदाजी असो वा गोलंदाजी, प्रत्येक गोष्ट करताना केशव महाराज देवाचे स्मरण नक्की करतो.

केशव महाराज फिरकी गोलंदाजी करतो. 2006 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो पहिला कसोटी सामना खेळला. यानंतर 2017 मध्ये एकदिवसीय आणि 2021 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या