Thursday, July 16, 2026
HomeनगरAhilyanagar : राजकीय दबाव झुगारून गुन्हेगारांचा बिमोड करा

Ahilyanagar : राजकीय दबाव झुगारून गुन्हेगारांचा बिमोड करा

गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आयजी येनपुरे यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून, गुन्हेगारी टोळ्यांचा कोणताही राजकीय दबाव न घेता कठोरपणे बिमोड करा. कायद्याच्या अंमलबजावणीत कोणीही अडथळा आणत असेल तर त्याची पर्वा करू नका. कायद्याने जे योग्य आहे तेच करा. गुन्हेगारांवर कारवाई करताना कोणताही दबाव झुगारून काम करा. अशा कारवाईत कोणत्याही अधिकार्‍याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, असा स्पष्ट संदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना दिला.

- Advertisement -

श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या खूनप्रकरणानंतर शहरात सलग चार दिवस बंद पाळण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक येनपुरे बुधवारी (15 जुलै) अहिल्यानगरला आले होते. त्यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात डोके वर काढणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना येनपुरे यांनी दिल्या. सराईत गुन्हेगारांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावर सतत नजर ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. अवैध शस्त्रांचा वाढता वापर लक्षात घेऊन गावठी कट्टे व इतर बेकायदेशीर शस्त्रांविरोधात जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अवैध शस्त्रांचा पुरवठा करणारे, त्यांचा वापर करणारे आणि गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जर कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून अथवा अन्य कोणाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तरी त्याला भीक घालू नका. पोलिसांनी केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्ष कारवाई करावी. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम राहिला पाहिजे. कायद्याची भीती संपली तर गुन्हेगारी वाढेल आणि त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील. कारवाई करताना अधिकार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास वरिष्ठ स्तरावरून संपूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तुम्ही निःपक्षपातीपणे काम करा, कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही दबाव घेऊ नका. योग्य कारवाई करणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असेही येनपुरे यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघे जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे पहाटे घरात घुसून कुटुंबाला धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोन...