अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवैध दारू विक्री तसेच जुगार व ऑनलाईन बिंगोवर छापे टाकले आहेत. या कारवाईत एकूण 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 लाख 86 हजार 70 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथकांची निर्मिती करून जिल्हाभरात व्यापक मोहिम राबविण्यात आली. 24 ते 30 जानेवारी या कालावधीत पथकांनी शेवगाव, एमआयडीसी, बेलवंडी, सुपा, पारनेर, सोनई, नेवासा, लोणी, अकोले, राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी, विदेशी तसेच गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्यांविरूध्द कारवाई केली.
या मोहिमेत 19 ठिकाणी छापे टाकून 19 गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन लाख 24 हजार 150 रूपये किमतीची दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याच कालावधीत तोफखाना, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुका, अकोले, कोतवाली, कोपरगाव शहर, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार व ऑनलाईन बिंगो खेळणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या अंतर्गत 10 ठिकाणी छापे टाकून 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 61 हजार 920 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरूध्द अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




