राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात अवैध दारू वाहतूक करणार्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत राहुरी पोलिसांनी एक स्विफ्ट डिझायर कारसह दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रगतीशाळा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कारमधून विनापरवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित पथक रवाना केले. प्रगतीशाळा परिसरात संशयित कार थांबवून तपासणी केली असता गाडीतून देशी दारूच्या 48 बाटल्या असलेला एक बॉक्स आणि बिअरच्या 12 बाटल्यांचा बॉक्स असा एकूण 6 हजार 800 रुपये किमतीचा विनापरवाना दारूचा साठा हस्तगत करण्यात आला.
तसेच 2 लाख 50 हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर गाडीही जप्त करण्यात आली. एकूण 2 लाख 56 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत गाडीचालक विजय सोमनाथ मगर (वय 42, रा. श्रीरामपूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गु.र.न. 1324/2025 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुरी पोलीस स्टेशनचे पो. नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने यशस्वीरित्या केली आहे.




