अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणार्या रॅकेटचा पर्दाफाश पुरवठा विभागाने केला आहे. यामध्ये 56 हजार 600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा निरीक्षक तेजस बाबुलाल पाटील (वय 24, रा. डावरेगल्ली, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी (20 ऑगस्ट) सकाळी एका फाउंडेशनने दिलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, कर्मचारी चंद्रकांत चाडे, शिवाजी चौधरी यांनी संयुक्त कारवाई केली. बुरूडगाव रस्त्यावरील दत्तकृपा डेअरीजवळ, इम्पेरियल हॉटेल मागील मोकळ्या जागेत टिनशेडमध्ये प्रथमेश राजू वाकचौरे (वय 23, रा. स्टेशन रस्ता, संभाजी कॉलनी, अहिल्यानगर) हा घरगुती गॅस सिलेंडरमधून काळ्या-पिवळ्या रंगाच्या ऑटो रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला. पथकाला पाहून ऑटोचालकाने पळ काढला.
शेडमध्ये तपासणी केली असता, 9 पूर्ण सिलबंद एचपी गॅस सिलेंडर व 1 अर्धवट भरलेला सिलेंडर, वजनकाटा, इलेक्ट्रिक सक्षन मोटर, नोजल व पेटीएम स्कॅन आढळून आले. स्कॅनरवर सुनील शहादेव लांडगे याच्या नावे असून, हाच या अवैध व्यवसायाचे मुख्य मालक असल्याचे वाकचौरेने सांगितले. प्रथमेश वाकचौरे आणि सुनील लांडगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





