Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते.

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम व नाशिक जिल्हाचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) , खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार अ‍ॅड. राहूल ढिकले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त डॉ.अशोक करंजकर, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकट गिते उपस्थित होते.

या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदीऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतुक व राजमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय स्वास्थ एंव परिवार कल्याण मंत्रालयाचे मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आयुष मंत्रायलयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्यात एका दिवशी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षणात ९०० पेक्षा अधिक प्रवेश क्षमता वाढल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाचा स्तर उचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जेणेकरुन जागतिक स्तरावर शिक्षणात भारतीय विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होतील. आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठांनी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब असून त्यासाठी आपण केलेले प्रयत्न कामी आले असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विद्यार्थ्यांना मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत देण्यात येईल यासाठी काम करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेवा व शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक जिल्हयात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला होता या संकल्पनेला मुर्त रुप आले आहे. आरोग्य क्षेत्रात वैद्यकीय माविद्यालयाच्या उद्घाटनाने विकासाचे नवीन पर्व सुरु झाले असल्याचे सांगितले.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतुक व राजमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून देशाच्या विकासाला गती मिळत आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. एकाच वेळी दहा वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणात नवीन पर्व सुरु झाले आहे. एकाच वेळी दहा वैद्यकीय महाविद्यालयांचा उद्घाटन हा रेकॉर्ड असून आजपर्यंत इतक्या मोठया प्रमाणात आरोग्य सेवांसाठी कार्य करणारे शासनाचा हा उल्लेखनीय काम असल्याचे सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्राचा पाया मजबूत करुन तो जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात शिक्षण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या मोठया प्रमाणात संधी आहेत. युवा पिढीने कौशल्य विकसित केल्यास जागतिक स्तरावर त्यांना काम करता येईल. सामाजिक आरोग्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रभावी योजना कराव्यात जेणेकरुन त्यांचा उपयोग सर्वसामान्यांना होईल असे सांगितले.

आरोग्यसेवा व शिक्षण बळकटीसाठी आरोग्य विद्यापीठाचे कार्य कौतुकास्पद-पालकमंत्री भुसे
आरोग्य विभागात विकास कामांना अधिक वेग आला असून गेल्या वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी मान्यता मिळाली असून वैद्यकीय पदवीसाठी नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. आरोग्यसेवा व शिक्षण बळकट करण्यासाठी विद्यापीठाची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वास्थ्य भारत संकल्पनेला मुर्त रुप मिळाले आहे. प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यामुळे दूर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. प्रवेश क्षमता वाढल्याने अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित झाल्याने शिक्षण व संशोधनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे अधिकारी, शिक्षक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या