Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआरोग्य सेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ

आरोग्य सेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या संकटात काम करताना करोना योद्धा ठरत असलेल्या आरोग्य सेवकांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच महापालिकेत आरोग्य सेवक म्हणून कामासाठी मुलाखत देऊन कामावर हजर न होणार्‍या सेवकांना नोटिसा देण्यात आल्या असून यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून केली जात आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेने कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, शहरी आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्णांसाठी केल्या जाणार्‍या कामाचे स्वरूप पाहता खालीलप्रमाणे पदनामाच्या मानधनात वाढ केली आहे. यात फिजिशियन यांचे मानधन दीड लाखवरून अडीच लाख रुपये प्रतिमहिना, मल्टी स्किल हेल्थ वर्कर यांचे मानधन सात हजार रुपयांवरून 12 हजार रुपये प्रतिमहिना, आया व वॉर्ड बॉय यांचे मानधन सहा हजार रुपयांवरून 12 हजार रुपये प्रतिमहिना तसेच एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांचे मानधन रुपये 75 हजारवरून रुपये एक लाख प्रतिमहिना, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांचे मानधन रुपये 40 हजारवरून रुपये 60 हजार प्रतिमहिना, स्टाफ नर्स या पदासाठी रुपये 17 हजारवरून रुपये 20 हजार प्रतिमहिना व एएनएम या पदासाठी रुपये 15 हजार रुपयांवरून 17 हजार रुपये प्रतिमहिना अशी मानधनात वाढ केलेली आहे.

ही मानधनातील वाढ फेब्रुवारी 2021 पासून कोविडअंतर्गत मानधनावर काम करणार्‍या अधिकारी, सेवकांनाना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. यात सहभागी होऊन जे सहाशे उमेदवार रुजू झालेले नाहीत त्यांनी याची नोंद घेऊन त्वरित महापालिकेमध्ये रुजू व्हावे अन्यथा महापालिकेकडून रुजू न झालेल्या उमेदवारांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी रविवारी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. जे अधिकारी, सेवक सबळ कारणाशिवाय रुजू होणार नाहीत त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी आदेशित केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. कोविडकाळात नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नाशिक महापालिकेतर्फे कोविड-19 अंतर्गत आतापर्यंत मानधनावर 1321 पदे भरण्यात आली.

यामध्ये सोळा विविध पदनामांच्या 1321 पदांना जाहिरातीच्या माध्यमातून रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आले. यापैकी 11 एप्रिल 2021 पर्यंत 721 अधिकारी-सेवक महानगरपालिकेमध्ये रुजू झालेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करत असताना मनुष्यबळ महत्त्वाचे असल्याने मनपास्तरावर विविध पदनामांच्या 1321 पदांना जाहिरातीच्या माध्यमातून फिजिशियन, एमबीबीएस, बीएएमएस, स्टाफ नर्स, एएनएम, एमडी मायक्रोबायोलॉजी, एमएससी मायक्रोबायोलॉजी, सिटी स्कॅन तंत्रज्ञ, एमआरआय तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी स्किल हेल्थ वर्कर या पदनामच्या 1321 उमेदवारांना रुजू होण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. त्यापैकी सोमवारपर्यंत 721 उमेदवार रुजू झाले असून 600 उमेदवार कोणतेही कारण न सांगता रुजू झालेले नाहीत. आता रुजू न होणार्‍या आरोग्य सेवकांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या