मुंबई । प्रतिनिधी Mumbai
आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी २० रुपये देण्यात येत होते. आता एका आधार नोंदणीसाठी ५० रुपये मिळणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी दिली.
डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात राज्याने पुढाकार घेतला असून अद्ययावत आधार संच मिळावे, अशी मागणी राज्यातील आधार केंद्रांची होती. त्यानुसार नवीन आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रवींद्र नाट्य मंदिर येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १०० आधार केंद्र चालकांना आज आधार संच सुपूर्त करण्यात आले.यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, जिल्हाधिकारी मुंबई शहर आंतल गोयल, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यात १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ० ते ५ या वयोगटातील बालकांची नोंदणी ही ३९ टक्के इतकी झाली आहे. तर ५ ते १७ या वयोगटातील मुला-मुलींचे बायोमेट्रिक करण्यात फारशी प्रगती नाही. त्यामुळे यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विभागवार प्रथम एक लाख, द्वितीय ५० हजार तर तृतीय उद्दिष्ट साध्य करणाऱ्याला ३० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले