Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना चाचण्यांची संख्या वाढवा

करोना चाचण्यांची संख्या वाढवा

मुंबई |प्रतिनिधी

राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुंटे यांनी आज पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.

काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वे करावा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे कुंटे यांनी सांगितले.

कंटेनमेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा, अशी सूचना सीताराम कुंटे यांनी केली.

सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून प्रत्येक त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे, तेथे लसीकरण वाढविण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या