Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाInd vs Aus 1st T20 : भारताचा ११ धावांनी विजय

Ind vs Aus 1st T20 : भारताचा ११ धावांनी विजय

दिल्ली | Delhi

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील मनुका ओव्हल स्टेडियमवर होत असलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

तसेच ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकात ७ बाद १५० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ११ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जाडेजाचं मैदानावर नसणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडत होत. त्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल टाकत आणि धावा बहाल करत कांगारंना मदतच केली. अखेरीस चहलने कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, ३५ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर चहलनेच स्टिव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडलं.

यानंतर फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडत टी. नटराजनने कांगारुंच्या अडचणींमध्ये भर टाकली. मॅक्सवेल नटराजनची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली पहिली विकेट ठरला. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टलाही नटराजनने माघारी धाडलं, त्याने ३४ धावा केल्या. हा धक्का कमी होता तोच चहलने मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवत कांगारुंना पाचवा धक्का दिला, ज्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्याऐवजी कांगारुंचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावरुच शकले नाहीत. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ तर दीपक चहरने १ बळी घेतला.

वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर विराट ९ धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता, परंतू दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या