दिल्ली | Delhi
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३०२ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाला ५० षटकात विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान दिले आहे.
मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुबमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. एककीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. आपलं अर्धशतक झळकावत विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना केला. परंतू जोश हेजलवूडने विराटला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला, त्याने ६३ धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा जोडीने पुन्हा एकदा संयमी खेळ करत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हार्दिकने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने २ तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी १-१ बळी घेतला.