मुंबई | Mumbai
भारत वि ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीत भारताची टॉप फलंदाजी ऑर्डर फेल ठरली. पण तरी जडेजा-केएल राहुल आणि बुमराह-आकाशदीप यांच्या भागीदारीमुळे भारताने फॉलोऑनची नामुष्की टाळली आहे. टीम इंडियाला दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी बॅटिंगचे धडेच दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर असला तरी बुमराह-आकाशदीप यांची धडाकेबाज खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी ठरली.
भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी अखेरच्या काही षटकांमध्ये धावांची आवश्यकता असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. बुमराह-आकाशदीपने उत्कृष्ट बचावात्मक फलंदाजी करत भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोठी भूमिका बजावली. ज्यावेळी ९ वी विकेट पडली त्यावेळी भारतीय संघाला ३३ धावा आणखी करायच्या होत्या. या धावा बुमराह आणि आकाश दीपच्या जोडीने ३९ धावा केल्या आणि भारताला फॉलोऑनपासून वाचवले आहे.
केएल राहुलच्या ८४ (१३९) दमदार अर्धशतकानंर रवींद्र जडेजाने ७७ (१२३) केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०० धावांचा आकडा पार केला. पण भारतीय संघाच्या धावफलकावर २१३ धावा असताना जड्डू बाद झाला अन् भारतीय संघावर १३ वर्षांनी फॉलोऑनची नामुष्की ओढावण्याचे संकेत दिसू लागले. पण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप या जोडीकडून आवश्यक असणाऱ्या ३३ धावा करत संघावरचे फॉलोऑनचे मोठे संकट टाळले.
भारताची टॉप ऑर्डर फेल
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताची टॉप ऑर्डर फेल ठरली. यशस्वी जैस्वाल पुन्हा अपयशी ठरला. त्याने २ चेंडूत फक्त ४ धावा केल्या. शुबमन गिल ३ चेंडूत १ धावा करून आऊट झाला. विराट कोहलीने १६ चेंडूत ३ धावा करत तंबूचा रस्ता धरला. रिषभ पंतलाही या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो १२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. हे चार गडी दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा पण १० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागील दोन कसोटी सामन्यात दमदार खेळी करणारा नितेश कुमार रेड्डीने ६१ चेंडूचा सामना केला. पण यावेळी त्याने संघाच्या धावसंख्येत फक्त १६ धावांची भर घातली.
केएल राहुलने केवळ या सामन्यातच नव्हे, तर संपू्र्णय दौऱ्यावर फलंदाजीत योगदान दिले आहे. या डावातही एका बाजूने विकेट्स जात होते, तर एका बाजूने केएल राहुल खिंड लढवत उभा होता. त्याने या डावात फलंदाजी करताना ८४ धावांची खेळी केली. त्यानंतर रविंद्र जडेजाने ७७ धावांची खेळी करत संघाला २०० पार पोहोचवले.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करतान ट्रेविस हेड पुन्हा एकदा चमकला. गेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. या सामन्यातही त्याने १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावा केल्या. शेवटी अॅलेक्स कॅरीने फलंदाजी करताना, ७० धावांची खेळी केली.