मुंबई | Mumbai
आयसीसी टी-20 विश्वचषकाचा बिगुल शनिवारी वाजला आणि पहिल्याच सामन्यात भारताने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला 29 धावांनी पराभूत केले आहे. यासह स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. एक क्षण हा सामना भारत गमवेल असं वाटत होते. पण भारताने जबरदस्त कमबॅक केले. भारताने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ निर्धारित षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने या स्पर्धेतील आपले पहिले दोन गुण खात्यात जमा केले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत खराब ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी काही आकर्षक फटकेही मारले, पण पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शॅडली वान शल्कविकने सामन्याचं चित्रच बदलून टाकले. षटकाच्या दुसर्या चेंडूवर ईशान किशन 20 धावा करत बाद झाला. पुढच्या दोन चेंडूवर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनाही माघारी पाठवले. यानंतर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्यांकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. अक्षर पटेल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूमध्ये नाबाद 84 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार लगावले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्येच यूएसएने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. येथून मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केला. मिलिंद कुमारने 100 स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकार यांचा समावेश होता. मात्र, वरुण चक्रवर्तीने मिलिंदचा अडथळा संपवला. यानंतर मैदानावर फिरकीपटू अक्षर पटेलचा जादू पाहायला मिळाला. अक्षरने सलग चेंडूवर संजय कृष्णमूर्ती आणि हरमीत सिंग यांना बाद करत अमेरिकन डावाची कणा मोडली. संजयने 2 चौकार आणि 1 षटकारासह 31 चेंडूत 37 धावा केल्या, तर हरमीत सिंगला खातेही उघडता आलं नाही. अखेरीस अमेरिकन संघ भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही आणि डाव 132 धावांवर आटोपला.





